

Mumbai Political News : हात दाखवून अवलक्षण... अशी एक म्हण मराठीत प्रचलित आहे. माजी मंत्री, प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांची अवस्था पाहिली की या म्हणीची प्रचिती येते. एखादा निर्णय चुकल्यास अत्यंत आक्रमक, मोठा जनसंपर्क असलेल्या नेत्याचीही काय अवस्था होऊ शकते, हे त्यांना पाहिल्यानंतर लक्षात येईल.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या आमदार कडू यांनी शिवसेनेत झालेल्या बंडाळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बोट धरून गुवाहाटी गाठली. सत्तांतर झाले, मात्र बच्चू कडू यांच्या हाती त्यांना अपेक्षित असलेले लागले नाही. उलट बंडखोरांवरील लोकांच्या नाराजीचे, टीकेचे ते वाटेकरी ठरले.
(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअॅप चॅनल जॉईन करा)
भाजपच्या गोटात गेलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आमदार कडू यांच्यावर सातत्याने टीका केली आहे. आता त्याचा पुढचा अध्याय सुरू झाला आहे. नवनीत राणा खासदार असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघावर आमदार कडू यांनी गुरुवारी धाराशिवमध्ये एका कार्यक्रमात दावा केला. मी खूप भोगले आहे, माझ्यावर साडेतीनशे खटले दाखल आहेत, असे सांगत शिवसेनेत बंडखोरी करून झालेल्या सत्तांतराच्या नाट्यात गमावलेली सहानुभूती मिळवण्याचा ते प्रयत्न करत आहेत.
बच्चू कडू हे अचलपूरचे आमदार आहेत. तेथून ते सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. यावरून त्यांचा जनसंपर्क, लोकप्रियता आणि त्यांनी केलेल्या कामाची प्रचिती येते. राज्यात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांना राज्यमंत्रिपद मिळाले. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर खासदार राणा आणि त्यांचे पती, बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी भाजपशी जवळीक साधली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात या दाम्पत्याने सतत स्टंटबाजी केली.
दरम्यान, शिवसेनेत बंडखोरी झाली आणि ४० आमदारांसह एकनाथ शिंदे बाहेर पडले. त्यांच्यासोबत काही अपक्ष आमदारही सरकारमधून बाहेर पडले. त्यांनी शिंदेंना पाठिंबा दिला. त्यावेळी बंडखोरांच्या विरोधात ५० खोके एकदम ओके ही घोषणा प्रचंड लोकप्रिय झाली. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी या आमदारांना प्रत्येकी ५० खोके मिळाल्याचा आरोप झाला.
लोक तोंडावरच ५० खोक्यांचा उल्लेख करत आहेत, असे खुद्द बच्चू कडू यांनीच एकदा सांगितले होते. त्यात भर म्हणून की काय कडू यांनी शिंदेंना पाठिंबा देण्यासाठी ५० खोके घेतले, अशा स्वरूपाचा आरोप आमदार राणा यांनी केला. त्यावेळेपासून आमदार कडू आणि राणा दाम्पत्यामध्ये राजकीय वैर निर्माण झाले आहे. त्याचाच पुढचा अध्याय म्हणून आता आमदार कडू यांनी अमरावती मतदारसंघावर आपल्या पक्षाचा दावा सांगून राणा दाम्पत्याला डिवचले आहे.
एकनाथ शिंदेंच्या बंडाला पाठिंबा देणाऱ्या आमदार बच्चू कडू यांची झोळी मात्र रिकामीच राहिली. दिव्यांग मंत्रालयाची स्थापना करून त्याचे कॅबिनेट मंत्रिपद दिले जाईल, असे आश्वासन कडू यांना मिळाले होते. मात्र, आतापर्यंत झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारांमध्ये त्यांची दखल घेण्यात आलेली नाही. भाजपला तसेही अपक्षांची झंझट नकोच होती. शिवसेना फुटल्यानंतरही हे अपक्ष आमदारांच्या लक्षात आले नाही.
शिवसेनेचे ४० आमदार सोबत आल्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठीचे अपक्ष आमदारांचे महत्त्व जवळपास संपले होते. आता तर राष्ट्रवादीचेही ४० आमदार सोबत आहेत. त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तरी बच्चू कडूंसह कोणत्याही अपक्षाला मंत्रिपद मिळणार नाही. तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाविद्यालयीन जीवनापासूनच बच्चू कडू यांनी संघर्ष केला आहे. दिव्यांगांच्या समस्या सोडवणे हा तर त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न. त्यामुळेच शिवसेनेत बंडखोरी झाली त्यावेळी ते गाफील राहिले, कारण त्यांना अपेक्षा होती दिव्यांग मंत्रालय मिळण्याची.
अपक्षांचे महत्त्व कमी होणार हे त्यांच्या लक्षात आले नाही. असलेले राज्यमंत्रिपद गेले, टीका वाट्याला आली आणि मिळाले तर काहीच नाही, अशा प्रसंगांतून बच्चू कडू यांना जावे लागत आहे. त्यामुळे गमावलेली सहानुभूती परत मिळवण्यासाठी आता ते कार्यक्रमांत भावुक होऊ लागले आहेत. माझ्यावर साडेतीनशे खटले दाखल आहेत, मी खूप भोगले आहे, असे सांगू लागले आहेत. राजकारणात महत्त्वाकांक्षा असली पाहिजे, पण टायमिंग चुकले की गणिते बिघडतात. एकनाथ शिंदेंची महाशक्ती ही काय चीज आहे, हे बच्चू कडूंच्या लक्षात आले नाही आणि त्यांनी हात दाखवून अवलक्षण करून घेतले. आता त्याचा वचपा काढण्यासाठी ते जंगजंग पछाडत आहेत, पण महाशक्तीने अद्याप तरी त्यांची साधी दखलही घेतलेली नाही.
Edited By - Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.