

Gondia Assault Case: काँग्रेसचे माजी आमदार गोपालदास अगरवाल यांना झालेल्या मारहाण प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे. यात भाजप नगरसेवक शिवकुमार शर्मां आणि राहुल हेमराज श्रीवास यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. या प्रकरणी निर्णय देताना जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. प्रतिनिधी यांनी या दोघांना अनुक्रमे ५ वर्षांची शिक्षा व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर याच प्रकरणात इतर ४ आरोपीची निर्दोष मुक्तता केली. ही सुनावणी गुरुवारी (२५ जून) पार पडली.
माजी आमदार गोपालदास अग्रवाल हे ९ एप्रिल २०१६ रोजी कुडवा येथील हॉटेल ग्रँडसीता येथे काँग्रेस पक्षातर्फे पत्रकार परिषद घेत होते. या सभेत नगरसेवक शिवकुमार शर्मा आणि राहुल श्रीवास यांनी येऊन माजी आमदार गोपालदास अग्रवाल, त्यांचे पुत्र विशाल अग्रवाल व इतर लोकांना मारहाण करून पळ काढला होता. या घटनेची तक्रार रामनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.
याप्रकरणी शिवकुमार शर्मा यांच्यासह ६ जणांविरुद्ध भादंवि कलम ३०७, १२० (ब), ३२४, ३२७, २९४, ५०५, २१२ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास रामनगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार ताईतवाले यांनी केला होता. त्यानंतर तत्कालीन पोलिस निरीक्षक नन्नावरे यांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास करून दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणाची मागील ५ दिवसांपासून न्यायालयात सुनावणी सुरू होती. माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी आरोपींना अटकपूर्व जामीन मिळू नये म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला होता.
त्यामुळे आरोपी शिवकुमार शर्मा यांना शेवटपर्यंत जामीन मिळाला नव्हता. कोरोनामुळे सर्वोच्च न्यायालयातही कोणतीही सुनावणी झाली नाही त्यामुळे शर्मा यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात उपस्थित राहून स्वतःला अटक करवुन घेतले होते. माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी या प्रकरणात शासनाकडे मागणी करून तज्ज्ञ अॅड. पी. के. सत्यनाथन यांची नियुक्ती केली होती. त्यांनी वेळोवेळी न्यायालयात उपस्थित राहून या प्रकरणात सरकारी वकील म्हणून युक्तीवाद केला. यात सरकारी वकील पुरुषोत्तम आगाशे यांनी सुध्दा सहकार्य केले. जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. प्रतिनिधी यांनी २५ जून रोजी दुपारी ४ वाजता या प्रकरणाची सुनावणी सुरू केली. यावेळी अॅड. सत्यनाथन हे नागपूर येथून आभासी पद्धतीने उपस्थित होते. आरोपीचे वकील प्रकाश तोलानी है न्यायाधीश परीक्षेसाठी मुंबईला गेले होते. त्यामुळे त्यांच्या सहकारी वकिलांनी न्यायाधीशांकडे आरोपीची शिक्षा कमी करण्यासाठी युक्तीवाद केला.
चार आरोपींची निर्दोष मुक्तता
जिल्हा न्यायाधीश १ व ए. एस. प्रतिनिधी यांनी शिवकुमार शर्मा आणि राहुल श्रीवास यांना अनुक्रमे ५ वर्षे कारावास व अनुक्रमे ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच अनिमेष उर्फ राज लक्ष्मीनारायण दुबे, गजेंद्र रामचरण सते, परवेज पटेल, परवेज खान आणि जगजितसिंग उर्फ बिट्टू प्रितमसिंग भाटिया यांना या प्रकरणात निर्दोष मुक्त केले.
पोलिसांनी घेतले आरोपींना ताब्यात
शिक्षा सुनावणी पूर्ण होताच न्यायालय परिसरात उपस्थित पोलिस कर्मचान्यांनी शिवकुमार शर्मा आणि राहुल श्रीवास या दोघांना आपल्या ताब्यात घेतले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आरोग्य तपासणी केल्यानंतर दोघांची उशिरा रात्री भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.