Mahayuti News : माहीम मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढत आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर हे येथून उमेदवार आहेत. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महेश सावंत उमेदवार आहेत. मात्र, महायुती मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घ्यावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत.
अमित ठाकरेंना महायुतीकडून बिनविरोध पाठींबा देण्याची शक्यता असल्याचे वृत्त 'साम टिव्ही'ने दिले आहे. शिवसेना नेते,मंत्री दीपक केसरकर यांनी राज ठाकरेंची भेटी घेतली. या भेटीपाठोपाठ केसरकर सदा सरवणकर यांना भेटले. त्यामुळे महायुतीमधून अमित ठाकरेंना पाठींबा देत असल्याची चर्चा जोरदार आहे.
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठींबा दिला होता. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी सभा देखील घेतल्या. त्यामुळे राज ठाकरे विधानसभा निवडणूक महायुतीमध्ये लढतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा देत स्वतंत्र निवडणूक लढण्याची घोषणा केली.
ठाकरे कुटुंबातील आदित्य ठाकरे हे वरळीमधून आमदार आहेत. त्यांच्या पाठोपाठ अमित ठाकरे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे 2019 राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना वरळीत पाठींबा दिला होता तसा पाठींबा उद्धव ठाकरे हे अमित ठाकरेंना देतील, असा चर्चा होत्या. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने माहीम मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतला असून महेश सावंत हे माहीममधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत.
महायुतीमधून अमित ठाकरेंना पाठींबा देण्याची शक्यता असताना शिवडी मतदारसंघातील मनसेचे उमेदवार बाळ नांदगावकर यांना देखील महायुतीमधून बिनशर्त पाठींबा दिला जाणार असल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.