संजय परब -
Maharashtra Politics : दिशा सालियन प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची चौकशी करून, उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्याची खेळी सत्ताधारी महायुतीकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.
याप्रकरणी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची चौकशी करण्याची मागणी आमदारांकडून होत असल्याचे सांगत शिंदे सरकारने एसआयटी चौकशीचे आदेश जाहीर केले असले, तरी दिल्लीकरांकडून मिळालेला हिरवा कंदील आणि आगामी लोकसभा- विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य यांना चौकशीच्या भोवऱ्यात अडकून महाविकास आघाडीला सुरुंग लावण्याचे डावपेच खेळले जात आहेत, असे समजते.
मागच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी सालियन प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. पण, त्या दृष्टीने काही हालचाली झाल्या नव्हत्या. मात्र आता चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेत आणि संबंधित चौकशी अधिकाऱ्यांची नियुक्ती करत 'मातोश्री'ला घेरण्यात आल्याचे दिसत आहे.
आदित्य ठाकरे हे सातत्याने महायुती सरकारवर विविध मुद्य्यांवरून आक्रमकपणे टीका करत आहेत. शिवाय, मुख्यमंत्री शिंदे यांच्यावरही त्यांचा विशेष रोख असतो. याचबरोबर मुंबई महापालिकेतील कथित भ्रष्टाचार प्रकरणी त्यांनी सध्या रान उठवले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आदित्य यांना रोखून 'मातोश्री'ची ताकद कमी करायची असल्यास दिशा सालियान प्रकरण शिंदे सरकारच्या हाती आयतेच कोलीत . त्याला आता चौकशीची हवा देऊन उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला जितके बॅकफूटला नेता येईल तेवढे सत्ताधाऱ्यांना हवे होते आणि तसेच घडताना दिसत आहे.
दिशा सालियान मृत्यूप्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. यावरून सातत्यानं आदित्य ठाकरेंवर याप्रकरणी आरोप केले जात आहेत. विशेष करून भाजप आमदार नितेश राणे यांनी हा मुद्दा वारंवार उपस्थित करत आदित्य ठाकरेंवर थेट आरोप केले आहेत. या प्रकरणी स्वतः समोर न येता भाजप केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane), माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांना पुढे करून सालियन प्रकरण जिवंत ठेवण्याची खेळी असल्याचेही बोलले जात आहे.
विशेष म्हणजे दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास CBIकडून सुरू होता. पण, सीबीआयने या प्रकरणात कोणताही राजकीय हेतू दिसत नसून दिशाचा मृत्यू हा इमारतीवरून तोल जाऊन पडल्यामुळे झाला आहे, असा निष्कर्ष तपासाअंती काढला होता. तसेच सीबीआयने वेगळा गुन्हा सुद्धा दाखल केला नव्हता.
मात्र सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात हे प्रकरणही तपासण्यात आले होते. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात कोणताही पॉलिटिकल अँगल नाही. शिवाय साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे सीबीआयने हा निष्कर्ष काढला असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
आता एवढी चौकशी होऊनदेखील पुन्हा एसआयटी तपास सुरू करण्याचा शिंदे सरकारचा निर्णय हा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे दिशाच्या आई-वडिलांनी सुद्धा आमची मुलगी तर या जगात आता नाही, पण मृत्यूनंतर तरी तिच्याविषयी चौकशी आणि त्यानंतर पुन्हा तपास करून आम्हाला त्रास देऊ नका, अशी विनंती केली होती.
याशिवाय आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी काही महिन्यांपूर्वी शिंदे गटात प्रवेश करत, सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणात आदित्य यांच्या सखोल चौकशीची मागणी केली होती. या प्रकरणात कनालचे नाव सुद्धा आल्याने कारवाई टाळण्यासाठी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची टीकाही होत होती.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.