Mumbai News : मुंबईच्या दहिसरमधील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. घोसाळकर यांच्यावर मॉरिस नाेरोन्हाने गोळीबार करत हत्या केली. यानंतर मॉरिसने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. (Abhishek Ghosalkar Murder Case Update)
तर काही दिवसांपूर्वीच उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस स्टेशनमध्येच शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्वचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. ही घटना ताजी असतानाच दहिसरमधील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अभिषेक घोसाळकर यांची मॉरिसने गोळ्या घालून हत्या केली. मात्र, त्याने स्वत:ला कसं संपवलं ? याबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. यातच मॉरिसच्या मृत्यूसंदर्भात ठाकरे गटाच्या आमदाराने खळबळजनक दावा केला आहे. मॉरिसची आत्महत्या नाही, तर हत्या घडल्याचा दावा आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे.
माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर आणि मॉरिसमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद होता, असे सांगितले जाते. मॉरिस काही दिवस जेलमध्येही होता, तर आपल्याला अभिषेक घोसाळकर यांच्यामुळेच जेलमध्ये जावं लागलं, असा समज मॉरिसचा होता. यातूनच त्याने शांत डोक्याने अभिषेक घोसाळकरची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांना मॉरिसने एका कार्यक्रमासाठी कार्यालयात बोलावून घेतलं. त्यानंतर फेसबुक लाइव्ह केलं. या लाइव्हच्या माध्यमातून काही वेळ त्यांनी संवाददेखील साधला. यानंतर शेवटी मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर तब्बल चार ते पाच राऊंड फायर केल्याचं सांगितलं जातं.
यामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला, तर अभिषेक घोसाळकर यांच्यावर केलेल्या गोळीबारात मॉरिसने संपूर्ण गन खाली केली. यानंतर त्याने ऑफिसमध्येच पुन्हा गनमध्ये गोळ्या भरल्या आणि नंतर स्वत:च्यावर गोळी झाडत आत्महत्या केली, अशीदेखील माहिती आता समोर येऊ लागली आहे. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास पोलिस करत असून, मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांची हत्या का केली ? हे तपास पूर्ण झाल्यानंतरच समोर येईल.
(Edited By-Ganesh Thombare)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.