
Mumbai, 23 December : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झालेले छगन भुजबळ यांनी आज (ता. 23 डिसेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधत काही नरमाईची भूमिका घेतलेली दिसत आहे. मात्र, फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळ हे आज दिल्लीला जाणार असून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्याविरोधात कडक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. भुजबळांनी कालच अजित पवार यांना काही सवाल केले होते. एकीकडे भुजबळ हे अजित पवार यांच्या विरोधात आक्रमक भूमिका मांडत असताना अजित पवार मात्र शांतपणे पाऊले टाकत आहेत. मात्र, भुजबळ यांच्या मनात दुसरेच काहीतरी शिजत असल्याचे दिसून येत आहे.
छगन भुजबळ यांच्या नाराजीमुळे मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नाराज भुजबळ यांनी आज सकाळीच भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुंबईत भेट घेतली. भेटीनंतर भुजबळ यांनी ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाही, असे फडणवीसांनी सांगितल्याचे नमूद केले. तसेच मला थोडा वेळ द्या. मी सगळं व्यवस्थित करेन, असेही आश्वासन फडणवीसांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर माजी मंत्री छगन भुजबळ हे दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. दिल्लीत छगन भुजबळ हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. छगन भुजबळ हे थोड्याच वेळात दिल्लीकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे. दिल्लीतून भुजबळ हे परदेशात जाणार आहेत. ते दहा दिवस परदेशात असणार आहेत, असेही सूत्रांनी सांगितले.
छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांना भेटण्याऐवजी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नाराज भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपची वाट धरणार का, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. मात्र, भुजबळांनी त्यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत प्रतिक्रिया काय येते, याची आता प्रतीक्षा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.