

BMC BJP Party Leader Appointment : मुंबई महापालिकेत आता सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यानुसार आज भाजप-शिवसेनेच्या नगरसेवकांच्या गटाची नोंदणी होणार आहेत. तत्पूर्वी भाजपनं महापालिकेत आपला गटनेताही निवडला आहे.
विशेष म्हणजे हा निष्ठावंत मराठी चेहरा असल्याचं सांगितलं जात आहे. गणेश खणकर यांची गटनेतेपदी नियुक्ती झाली आहे. यानंतर आता महापौरपदी आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी होणार याकडं सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.
ठाणे, केडीएमसी, उल्हासनगरनंतर आता मुंबईचाही फॉर्म्युलाही जवळपास निश्चित झाला आहे. महापौरपद आणि स्थायी समितीचं अध्यक्षपद हे भाजपकडं असणार आहे. तर शिवसेनेला उपमहापौरपद देण्यात येणार आहे. मुंबईत भाजप हा क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. तसंच भाजप-शिवसेनेनं युतीमध्ये निवडणूक लढलेली असल्यानं उपमहापौरपदी शिवसेनेला संधी दिली जाणार आहे.
दरम्यान, भाजप-शिवसेनेच्या नगरसेवसांची आज गटनोंदणी होणार आहे. त्यासाठी निवडून आलेले हे सर्व नगरसेवक मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात दाखल झाले आहेत. यावेळी भाजपच्या नगरसेवकांकडून जय श्रीरामचे नारे देण्यात आले. त्यानंतर काही वेळातच भाजपच्या गटनेता निवडीची प्रक्रिया पार पडली.
यावेळी गणेश खणकर (Ganesh Khankar) यांची गटनेतेपदी निवड झाली त्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी जय शिवाजी, जय भवानी, भारत माता की जय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो, हर हर महादेव अशी घोषणाबाजी केली.
गेल्या अनेक वर्षांपासून गणेश खणकर हे भाजपत काम करत आहेत. एक निष्ठावंत मराठी कार्यकर्ता म्हणून खणकर यांची ओळख आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची त्यांची पार्श्वभूमी आहे. उत्तर मुंबईचे ते रहिवासी असून भाजपचे महामंत्री राहिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.