Maharashtra Political News : मराठा समाजाच्या आरक्षणावरून राज्यात रान पेटले आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी समाजाने उघडपणे विरोध केला आहे. परिणामी राज्यात मराठा विरोधी ओबीसी असे चित्र निर्माण झाले आहे. कधी नव्हे ते आपल्या समाजाच्या मागणीसाठी सत्ताधारी आणि विरोधातील नेते एकवटले आहेत. राज्यात हा वाद चिघळला असतानाच मुंबईत शिवतीर्थावर शिवसेनेचे दोन्ही गट भिडले. यामुळे ऐन दिवाळीत राज्यात धुळवड सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्यातील विविध ठिकाणी मोठ्या राजकीय घडामोडी होत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या हालचालींना वेगळेच महत्त्व आहे. जालन्यातील ज्या तालुक्यातून मनोज जरांगेंनी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राची मागणी केली, त्याच अंबड येथे ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार सभा होत आहे. या सभेला राज्यातील दिग्गज ओबीसी नेते हजेरी लावणार आहेत. ते काय बोलणार, याकडे राज्याचे लक्ष आहे.
मनोज जरांगे पाटील दुसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढताना दिसत आहेत. एकीकडे मराठवाड्यात ओबीसी महाएल्गार सभा होत असताना जरांगे पाटील सातारा, सांगली, कोल्हापूर येथे मराठा समाजाशी संवाद साधणार आहेत. दरम्यान, त्यांनी भर सभेतून भुजबळांवर सडकून टीका केली आहे. सर्व सामान्य ओबीसी मराठ्यांना पाठिंबा देतात, पण नेते गोंधळ घालत असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. त्यावर ओबीसी नेतेही जरांगे पाटलांवर निशाणा साधत आहेत.
मराठा आणि ओबीसी एकमेकांसमोर ठाकले असताना मुंबईत गुरुवारी रात्री सत्ताधारी शिवसेना आणि ठाकरे गट भिडले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यावरून या दोन्ही गटांत मोठा वाद झाला. दोन्ही पक्षांतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवरताना पोलिस प्रशसनाची चांगलीच तारांबळ उडाली. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शिवतीर्थावर मोठ्या बंदोबस्तासाठी फौजफाटा वाढवण्यात आला आहे.
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईतील या घटनांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या घटनांचा कुणाला फायदा होणार, हे येणारा काळच ठरवले. दरम्यान, सध्या तरी राज्यात ऐन दिवाळीत राजकीय धुळवड होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.