
Mumbai News, 13 Dec : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर जात राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग केला. तेव्हापासून मागील दोन ते तीन वर्षात राज्यातील राजकारणात अनेक अनपेक्षित आणि धक्कादायक घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं.
त्यामुळे आता कोणता पक्ष कधी कोणासोबत युती-आगाडी करेल हे सांगणं कठीण झालं आहे. अशातच विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव झाल्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये अस्वस्थता असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे भाजपकडून राज्यात 'ऑपरेशन लॉटस' राबवलं जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
या सर्व चर्चा सुरू असतानाच गुरूवारी दिल्लीत आणखी एक मोठी घटना घडली. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीपासून एकमेकांचे चेहरे देखील न पाहणारे जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्याची भेट झाली. या भेटीनंतर राज्यातील राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
शरद पवारांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी आणि अजित पवार (Ajit Pawar) गटाचं मनोमिलन होणार का आणि ते भाजपसोब जाणार का? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं असतानाच गुरूवारी दुसरी एक मोठी घडामोड झाल्याचं सांगितली जात आहे. ती म्हणजे काल दुपारी उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एक बडा आणि भाजपच्या केंद्रीय नेत्याची बैठक पार पडल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
या भेटीमुळे आता राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नवीन राजकीय समीकरण उदयाला येणार का? याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. विधानसभा निवडणुकीचे निकालानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार, खासदारांमध्ये अस्वस्थता आहे. याच पार्श्वभूमीवर 4 डिसेंबरला पवारांच्या सर्व खासदारांची दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली.
या बैठकीत काही खासदारांनी सत्तेसोबत जाण्याचं मत व्यक्त केलं होतं. मात्र, सत्तेत जाण्यावरूही पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचं सांगितलं जात आहे. यामधील एका गटाचं मत भाजपसोबत जायचं, मात्र अजित पवारांच्या गटात विलीन व्हायचं नाही असं आहे. तर दुसऱ्या गटाचं मत अजितदादांच्या राष्ट्रवादीत सामील होण्याचं आहे.
मात्र, शरद पवार गटाचे अनेक नेते आता सत्तेत सामील होण्याच्या बाजूने असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे शरद पवारच सत्तेसोबत गेले तर राज्यातील राजकारणात मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. शिवाय शरद पवार गट सत्तेसोबत गेल्यास राज्यातील महाविकास आघाडीचं अस्तित्वचं संपुष्टात येऊ शकतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.