

मुंबई : अन्न सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी करत असलेल्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आता थेट बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) मुख्यालयातील कॅन्टीनवर मोठी कारवाई केली आहे. FDA आयुक्त IAS तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री उशिरा अचानक तपासणी मोहीम राबवली.
तपासणीत अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याने कॅन्टीन तात्काळ सील करण्यात आले. या कारवाईमुळे महापालिका आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
महापालिका मुख्यालयातील या कॅन्टीनमध्ये दररोज हजारो अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक नाश्ता व भोजन करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अन्नाच्या गुणवत्तेबाबत आणि स्वच्छतेबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. काही ग्राहकांनी ताकात माशी, भजीत प्लास्टिक आढळल्याचा दावा केला होता. त्यानंतर FDA ने या तक्रारींची गंभीर दखल घेत अचानक तपासणी करण्याचा निर्णय घेतला.
तपासणीदरम्यान अन्नपदार्थ साठवण्याची पद्धत, स्वयंपाकघराची स्वच्छता, अन्न हाताळण्याचे निकष, कर्मचाऱ्यांची स्वच्छता आणि अन्न सुरक्षा मानकांचे पालन यामध्ये अनेक त्रुटी निदर्शनास आल्या. काही खाद्यपदार्थ योग्य तापमानात न ठेवणे, स्वच्छतेकडे दुर्लक्ष आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे निरीक्षण अधिकाऱ्यांनी नोंदवले.
या पार्श्वभूमीवर FDA ने तातडीने कठोर कारवाई करत कॅन्टीनचे कामकाज बंद करून ते सील केले. संबंधित व्यवस्थापनाला आवश्यक सुधारणा करण्याचे आदेश दिले आहे. अन्न सुरक्षा कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
राज्यात निकृष्ट दर्जाचे अन्न, भेसळ आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात FDA ने अलीकडच्या काळात व्यापक मोहीम सुरू केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, उत्पादन युनिट्स आणि सार्वजनिक ठिकाणांवरील खाद्य व्यवसायांवर सातत्याने धाडसत्र सुरू आहे. BMC मुख्यालयातील कॅन्टीनवरील कारवाई ही त्याच मोहिमेतील महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.
FDA अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. सार्वजनिक आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नसून, दोषी आढळणाऱ्या संस्था आणि आस्थापनांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.