Mumbai News: राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. मात्र, आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून युतीत धुसफूस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी कोण मुख्यमंत्री होणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
अशातच आता भाजपच्या (BJP) केंद्रातील वरिष्ठ नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाऐवजी राज्यात उपमुख्यमंत्रिपद किंवा केंद्रातील मंत्रीपदाची ऑफर दिली आहे. मात्र, एकनाथ शिंदेंना ही ऑफर मान्य नसल्याची माहिती मिळत आहे. अशातच आता एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमधून माघार घेतल्याची माहिती आहे.
मात्र, मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमधून माघार घेताना शिंदेंनी महायुतीसमोर नवा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावामुळे भाजप श्रेष्ठींची चांगली कोंडी झाली आहे. कारण एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) आपल्याला राज्यात मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर महायुती सरकारचा संयोजक हे पद देण्याची मागणी केली आहे. कारण राज्यातील विधानसभा माझ्या नेतृत्त्वात लढली होती, असा दावा त्यांनी केल्याची माहिती आहे.
यावेळी त्यांनी मुलगा खासदार श्रीकांत शिंदेंना राज्याचं उपमुख्यमंत्रिपद द्यावं अशी मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदेंच्या या मागणीमुळे भाजप नेते धर्मसंकटात सापडले आहेत. दरम्यान, शिंदेंच्या या प्रस्तावावर भाजपने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, या मागणीमुळे महायुतीच्या गोटात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
तर शिंदेंच्या प्रस्तावामुळेच महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेला उशीर होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्रिपद सोडण्याच्या मोबदल्यात मुलाला उपमुख्यमंत्री करणं भाजप श्रेष्ठींना मंजूर होईल का? श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद दिल्यामुळे घराणेशाहीवरून टीका होण्याची भीती देखील भाजप नेत्यांना सतावण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रस्तावावर काय भूमिका घेतली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, काहीही करून महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यातील सत्ता स्थिर रहावी यासाठी भाजपच्या केंद्रातील नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपकडे बहुमताच्या जवळ जाणारे आकडे असतांनाही दोन मित्र पक्षांना सोबत घ्यावे लागणार आहे. या स्थितीत तिन्ही पक्षातील समन्वय टिकून ठेवण्याचा प्रयत्न केंद्रातील नेते करत आहेत.
शिवाय सर्वात मोठा पक्ष असतांनाही 2019 सारखी भाजपवर नामुष्कीची वेळ येऊ नये, याची विशेष काळजी देखील घेतली जात आहे. अशातच आता शिंदेंनी टाकलेल्या या गुगलीमुळे भाजप नेत्यांचं टेन्शन वाढलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.