Operation Tiger : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार आपल्या गळाला लावल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यातील काही खासदार दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत ऑपरेशन टायगर आता प्रत्यक्षात सुरू झालं असून त्यासाठी शिंदेंनी तगडी फिल्डिंग लावल्याचं दिसत आहे.
तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत कधी या ऑपरेशन टायगरच्या चर्चा खोट्या असल्याच म्हणतात. तर कधी ते या खासदारांना १५ कोटी रूपयांचा अॅडव्हान्स दिल्याचा दावाही करत आहेत. त्यामुळे राऊतांच्या दाव्यांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
अशातच आता संजय राऊतांनी एक खळबळजनक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी खुद्द आपल्याच खासदारांना विमानातून उचलून नेल्याचा दावा केला आहे. राऊतांनी एका विमानाचा फोटो शेअर करत आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'नांदेड विमानतळावर एक चार्टड विमान उतरते.
ऑपरेशन टायगरच्या नावाखाली दोन खासदारांना उचलून निघून जाते. यांची रिक्षात फिरण्याची औकात नव्हती, खासगी विमानाने फिरण्या एवढी किंमत ठाकरेनामा मुळे वाढली. प्रत्येक गोष्टीचा हिशोब केला जाईल. डरपोक कोल्ह्यांच्या पळवा पळविला टायगर का म्हणता?' असा सवाल करत त्यांनी खासदारांना विमानातून नेल्याचा दावा केला आहे.
त्यामुळे आता ऑपरेशन टायगर सुरू झाल्याचं राऊतांनीच मान्य केल्याचं दिसत आहे. कारण संजय राऊत यांनी काल रात्री देखी एक ट्विट केलं होतं. ज्यामध्ये खासदारांना १५ कोटींचा अॅडव्हान्स दिल्याचा दावा केला होता. राऊतांनी लिहिलं, 'अपना सपना मनी..मनी! महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी आज रात्री प्रत्येकी १५ कोटींचा अॅडव्हान्स देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे.'
दरम्यान, खासदार अरविंद सावंत, संजय राऊत आणि खासदार अनिल देसाई हे देखील दिल्लीला पोहचल्याची माहिती आहे. त्यामुळे आता ठाकरेसेना नेमकी काय पावलं उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर ठाकरेंची साथ सोडून शिंदेसेनेत दाखल होणाऱ्या खासदारांमध्ये संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.