

Delhi : महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाची जोरदार चर्चा असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुटंबासह दिल्ली गाठली. विशेष म्हणजे या भेटीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली. हेच टायमिंग साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका अतिउत्साही आमदाराने उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर केले.त्यावरून राजकीय गोंधळ उडाला. त्यावर ठाकरे गटाच्या खासदाराने शिंदे हे निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी दिल्लीला गेले असल्याची खोचक टिप्पणी केली. पण शिंदे दिल्लीहून मुंबईत येताच पंतप्रधान मोदींनी मराठीतून ट्विट करत मुख्यमंत्री शिंदेंच्या धडाडीचे कौतुक केले. मोदींचे हे कौतुक म्हणजे मुख्यमंत्र्यांना बळ ताकद देणारे असल्याचे बोलले जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदीं(Narendra Modi) सह अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधानांसोबतचे फोटो शेअर करतानाच मोदींचं तोंडभरून कौतुक केले होते. शिंदे ट्विटमध्ये म्हणतात, देशाचे पंतप्रधान म्हणून कणखर आणि सक्षम असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आज माझे वडील, पत्नी, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून आणि नातू यांच्यासह मला सदिच्छा भेटीला बोलावून आपलेपणाने विचारपूस केली. माझ्या कुटुंबाशी निवांत गप्पा मारल्या. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला.
आता मुख्यमंत्री शिंदे(CM Eknath Shinde) यांच्या ट्विटला पंतप्रधान मोदींनी रिट्विट केले आहे. यात शिंदेंविषयी गौरवोद्गार काढत महाराष्ट्राचे गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री असा उल्लेख करत गौरवोद्गार काढले. मोदींच्या ट्विटमुळे विरोधकांकडून मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना एकप्रकारे पूर्णविराम मिळाला असल्याचं बोललं जात आहे. थेट पंतप्रधान मोदींनीच ट्विट करत करत शिंदेंसाठी सुखद धक्का मानला जात आहे.
ट्विटमध्ये मोदी काय म्हणाले ?
''देशाचे पंतप्रधान म्हणून कणखर आणि सक्षम असलेल्या मा. जी यांनी आज माझे वडील, पत्नी, मुलगा खासदार जी यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीची त्यांची तळमळ आणि विनम्र स्वभाव कौतुकास्पद आहे...'', असे मोदींनी ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ट्विट काय..?
देशाचे पंतप्रधान म्हणून कणखर आणि सक्षम असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आज माझे वडील, पत्नी, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून आणि नातू यांच्यासह मला सदिच्छा भेटीला बोलावून आपलेपणाने विचारपूस केली. माझ्या कुटुंबाशी निवांत गप्पा मारल्या. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला असं एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.
'' मुंबईचा चेहरा बदलणार...''
महाराष्ट्रातील जनतेचे आयुष्य सुखकर करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विकासकामांबाबत त्यांनी यावेळी चर्चा केली. इर्शाळवाडीतील दुर्घटनेमुळे राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याबाबत सहवेदना व्यक्त करत या संकटात केंद्र सरकार पाठीशी असल्याचे ते म्हणाले. तसेच बचावकार्य आणि पुनर्वसनाबाबत माहिती घेतली. धारावी पुनर्विकास हा सर्वात मोठा प्रकल्प असून त्यामुळे मुंबईचा चेहरा बदलणार आहे. त्याचबरोबर गरीब नागरिकांना सुखाचे आयुष्य जगता येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प विनाअडथळा वेगाने पूर्ण करावा, रखडलेले पुर्नविकास प्रकल्प मार्गी लावावेत, असेही शिंदेंनी यावेळी सांगितले. (Latest Marathi News)
पायाभूत सुविधांना बळ मिळाले की राज्याच्या समृद्धीचा मार्ग प्रशस्त होतो. त्यामुळे राज्यातील असे प्रकल्प त्वरित पूर्ण करावेत, अशी सूचना त्यांनी केली. याशिवाय वारंवार होणारी अतिवृष्टी, त्यामुळे येणारी संकटे यावर आस्थेवाईकपणे चर्चा केली. कोकणात उदंड पाऊस पडून पाणी समुद्राला मिळते. हे पाणी दुष्काळग्रस्त भागात कसे वळवता येईल, मराठवाडा वॉटर ग्रीड या राज्य सरकारच्या योजनांबाबतही त्यांनी यावेळी माहिती घेतली. याशिवाय राज्यातील आरोग्य व्यवस्था, उपलब्ध शैक्षणिक सुविधा, आवश्यक बदल या मुद्द्यांवरही त्यांनी चर्चा केली.
पंतप्रधानांची आपुलकी, आशीर्वादाचा हात नवे बळ देणारी...
गेले वर्षभर केंद्र सरकारचे भक्कम पाठबळ राज्य सरकारला मिळत आहे. ते सहकार्य यापुढेही कायम मिळो, ही मागणी मान्य करत पंतप्रधानांनी आश्वस्तही केले. पंतप्रधानांची आपुलकी, आशीर्वादाचा हात आणि आस्था नवे बळ देणारी आहे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.