

Mumbai, 23 March : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या वेळी झालेल्या अभूतपूर्व गोंधळाचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. विधीमंडळात त्यावर आज जोरदार चर्चा आणि खडाजंगी झाली. मात्र, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा एसपीच्या निलंबनाच्या दिलेल्या निर्देशाबाबत खल झाला. मात्र, शशिकांत शिंदे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदे यांच्या जातीच्या दाखल्याबाबत विधान परिषदेत बोलताना मोठा दावा केला आहे, त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेची पुन्हा चर्चा रंगली आहे.
सातारा (Satara) जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी प्रिया महेश शिंदे यांची, तर उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड झाली आहे. मात्र, ती निवड करताना झालेल्या गदरोळामुळे संपूर्ण राज्यात सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक गाजत आहे. आता त्यात प्रिया शिंदे यांच्या जातीच्या दाखल्याची भर पडली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जिल्हा परिषद सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवल्याचा मुद्दा आज दोन्ही सभागृहात गाजला. शंभूराज देसाई, मकरंद पाटील यांनी विधान परिषदेत पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीची माहिती दिली, तर विधानसभेत अर्जून खोतकर आणि खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत भूमिका मांडली आहे. शिंदे यांच्या निवेदनातून अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या आहेत.
एकीकडे, सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर कारवाईची मागणी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे यांच्या जातीच्या दाखल्याबाबत विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला आहे.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी ओबीसीचे आरक्षण असताना ओपनमधून आलेल्या सदस्याला निवडून आणण्याचा निर्णय झाला. जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे यांचा दाखला हा बोगस आहे. तो बोगस दाखला सकाळी अकरा वाजता देण्यात आला होता, असा मोठा दावा शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत केला आहे.
अध्यक्षा प्रिया शिंदे यांचा दाखला बोगस आहे की नाही, याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी द्यावी, अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी या वेळी केली आहे. तसेच आम्ही त्याविरोधात कोर्टात जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे, त्यामुळे सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडी झालेल्या गोंधळाबरोबरच आता जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे यांचा दाखलाही नव्याने चर्चेत येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.