

Mumbai News: वादग्रस्त स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यापूर्वीही त्याच्या अनेक विधानांवरून मोठे निर्माण झालेले आहेत. त्यात एका शोदरम्यान कुणाल कामराने महाराष्ट्रातील राजकारण आणि एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक गाणं गात टीका केली होती. यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले, त्यांनी मुंबईतील कामराच्या शोच्या सेटची तोडफोड केली. तसेच त्याच्याविरोधात अनेक गुन्हेही दाखल झाले आहेत. आता याच कामराला थेट मुंबई पोलिसांची आठवण आली आहे.
कॉमेडियन कुणाल कामरानं रविवारी (ता.6 सप्टेंबर) सोशल मीडियावरील X प्लॅट फॉर्मवर एक खळबळ उडवणारी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने थेट मुंबई पोलिसांनाच खरमरीत सवाल केला आहे. त्यानं मुंबईत मी पुढचा स्टँड-अप शो कधी करणार,असा सवाल करत त्यानं मुंबई पोलिसांना टॅग केलं आहे. यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
कुणाल कामरानं आपल्या पोस्टमध्ये मनोरंजनाची राजधानी असलेल्या मुंबईत मला माझा स्टँड-अप शो कधी करता येणार?असा सवाल केला आहे. माझ्या पूर्वीच्या कामामुळे गेल्या काही वर्षांत प्रशासनामध्ये काही प्रमाणात उत्साह निर्माण झाल्याची मला जाणीव असल्याचा खोचक टोलाही त्यानं लगावला आहे.
तसेच मुंबई पोलिसांवर कायदा-सुव्यवस्था राखणे, गुन्हे रोखणे, वाहतूक व्यवस्थापन करणे, ‘इंडियाज गॉट लेटंट’वर लक्ष ठेवणे आणि कधीकधी मला एखाद्या सभागृहात विनोद सांगण्याची परवानगी आहे की नाही, हे ठरवण्यासारख्या अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत, याचीही मला जाणीव आहे, असं म्हणत मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा डिवचण्याची संधीही त्यानं सोडलेली नाही.
कुणाल कामरा आपल्या पोस्टमध्ये असंही म्हणतो की,त्यामुळे मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की, माझा प्रस्तावित कार्यक्रम—नेहमीप्रमाणे—शांततेत, बंदिस्त सभागृहात,१०० संमती देणाऱ्या प्रौढ व्यक्तींच्या उपस्थितीत आणि लागू असलेल्या सर्व कायदे व नियमांचे पालन करून आयोजित केला जाईल.
माझा फक्त एवढाच प्रश्न आहे की, जर ४०-५० विनोद समजून न घेणारे किंवा विनोदाचा आनंद न घेणारे लोक शो रद्द करण्यासाठी किंवा त्यात व्यत्यय आणण्यासाठी, अथवा कार्यक्रमस्थळाचे नुकसान करण्यासाठी आले, तर तुम्ही त्यांना आपला ‘व्हेटो’ वापरण्याची परवानगी देणार का?
ज्या लोकांनी माझा शो पाहण्यासाठी तिकीटही खरेदी केलेले नाही, अशा जमावाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मर्यादा काय असावी, हे ठरवण्याचा अधिकार मिळणार का? खरं तर आता हा प्रश्न फक्त एका गोष्टीपुरता मर्यादित आहे. तुम्ही जमावाच्या बाजूने आहात की कायद्याच्या?असा सवालही कामरा यानं आपल्या पोस्टमधून केला आहे.
कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक कविता लिहिली आणि ज्यानंतर शिवसैनिक हे आक्रमक झाल्याचं दिसून आलं होतं. कुणालने शिंदेंवर गद्दार नज़र वो आए..ही कविता लिहिली.ज्याचा व्हिडीओ हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.
मात्र, कुणाल कामराचा ज्या खारच्या हॉटेलमध्ये कुणालचा शो झाला,त्याच हॉटेलवर शिवसैनिक हे पोहोचले आणि त्यांनी तिथे तोडफोड केली.कुणाल कामराला माफी मागण्यासाठी शिवसेनेने अल्टिमेटम देखील दिला होता.तसेच त्याच्यावर अनेक एफआयआरही दाखल झाले आहेत. मात्र,तरी त्यानं कामराने “मला या जमावाची भीती वाटत नाही, मी माफी मागणार नाही,असं स्पष्टपणे सांगितलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.