
Mumbai, 13 December : मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे आणि भेटीगाठींना जोर आला आहे. मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांकडून जोरदार मार्चेबांधणी करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या यादीतून पत्ता कट झालेले माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भेटीसाठी वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यामुळे सावंतांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.
नागपुरात येत्या १६ तारखेपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे, त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीच्या पहिल्या दिवशी सांगितले होते. त्यानुसार नागपुरात सध्या मंत्र्यांच्या शपथविधीची कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. दुसरीकडे, मंत्रिपदासाठी इच्छुकांकडून गाठीभेटींवर भर दिला जात आहे.
शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीतून माजी मंत्री तानाजी सावंत (Tanaji sawant), दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, संजय राठोड यांचा पत्ता कट झाल्याची माहिती आहे. मात्र, मंत्रिपदासाठी हे नेतेही आडून बसले असल्याची माहिती आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. महायुतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला १० ते १२ मंत्रिपद येण्याची शक्यता असताना इच्छुकांची संख्या ही शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी ठरली आहे.
दरम्यान, मागील मंत्रिमंडळात आरोग्य मंत्री असलेले तानाजी सावंत हे आमदार भरत गोगावले यांना घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थान दाखल झाले आहेत. शिंदे यांच्याशी हे दोघे मंत्रिपदाच्या मुद्यावर आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावंत यांना पुन्हा मंत्रिपदी संधी मिळते की नव्या चेहऱ्याला शिंदे पसंती देतात, हे पाहावे लागणार आहे.
मंत्रिमंडळाचा येत्या रविवारी विस्तार होण्याची शक्यता आहे. त्या विस्ताराच्या यादीत आमदार भरत गोगावले यांचे नाव मंत्रिपदासाठी निश्चित झाल्याची माहिती आहे, तर माजी मंत्री तानाजी सावंत यांचे नाव पहिल्या यादीत नाही, त्यामुळे महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळात आपल्याला संधी मिळावी, यासाठी सावंतांकडून जोरदार धडपड होताना दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.