

Nagpur News, 6 march 2026: नागपूर महापालिकेचे आयक्त अभिजीत चौधरी यांची नुकतीच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे बदली झाली आहे. आज (शुक्रवारी) ते जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्याकडे आपला पदभार सोपवणार आहेत. नागपुरकरांचा निरोप घेत असताना अभिजीत चौधरी यांनी आपल्या कामाचा आलेख मांडला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे होमटाऊन असलेल्या नागपुरात आयुक्त म्हणून काम करणारे अभिजीत चौधरी यांनी आपल्यावर या दोन मंत्र्यांचे दडपण कसे होते, याबाबत दिलखुलासपणे सांगितले.
नागपूर महापालिकेत चौधरी यांनी सुमारे पावणे तीन वर्षे सेवा दिली. चौधरी यांनी यातील सर्वात मोठा काळ ‘प्रशासक’ काम पाहिले. या काळात लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यशैलीवर अनेकदा नाराजी व्यक्त केली होती, अगदी सत्ताधारी आमदारांनीही त्यांच्या तक्रारी केल्या होत्या, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
भाजपच्या माजी नगरसेवकांनी नागरिकांच्या ऑनलाईन तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला होता. आता महापालिकेत पुन्हा लोकप्रतिनिधींचे शासन आले असल्याने, या तक्रारींचे निवारण करण्याची जबाबदारी आता नगरसेवकांवरच असेल, असे संकेत देत त्यांनी लोकप्रतिनिधींना चिमटा काढला.
आयुक्तपदावरुन जाता जाता चौधरी यांनी शहराला मिळत असलेल्या निधीवरुन भाष्य करीत महापालिका प्रशासन आणि नगरसेवकांना सल्ला दिला. चौधरी म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे नागपूर शहराला मोठा निधी उपलब्ध झाला. त्यांच्या पाठबळामुळे निधीची कधीच कमतरता भासली नाही. मात्र, ही परिस्थिती कायमस्वरूपी राहीलच असे नाही. महापालिकेला भविष्यात स्वतःच्या उत्पन्नाचे स्रोत वाढवावेच लागतील. त्यासाठी मालमत्ता करात वाढ करणे आणि उत्पन्नाचे इतर पर्याय शोधणे अनिवार्य आहे,"
नागपूर हे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांचे शहर असल्याने कामाचे थोडे दडपण असायचे, येथे काम करताना नेहमी ‘अलर्ट’ राहावे लागायचे. मात्र, दिग्गज नेत्यांसोबत काम करण्याचा हा अनुभव आता पुण्यात काम करताना नक्कीच उपयोगात येईल. शहरात गेल्या तीन वर्षांत अनेक सुधारणा आणि चांगले निर्णय घेता आल्याचे समाधान आहे, असेही चौधरी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.