

उत्तम कुटे-
Pimpri Chinchwad : राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर आढावा बैठका, दौरे यांना वेग आला आहे. याचवेळी पुण्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या शिरुर लोकसभेसाठी आधी तळ्यात मळ्यात असलेल्या विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्याच नावावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. यानंतर आता मतदारसंघात भेटत नसल्याची मतदारांची व विरोधकांचीही तक्रार असलेले कोल्हे यांनी आता जोरदार तयारी सुरु केली आहे.
शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे (Amol Kolhe) हेच आगामी २०२४ च्या लोकसभेला पुन्हा पक्षाचे उमेदवार असतील असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी (ता.५) पुण्यात जाहीर केले होते. त्यानंतर पक्षाच्या महत्वाच्या बैठकांकडे पाठ फिरवून दुसरीकडे भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेणारे आणि शिरूरकरांना वरचेवर न भेटणारे खासदार डॉ.कोल्हे हे मतदारसंघात जोमानं फिरू लागल्याचं अधिक सक्रिय झाल्याचं दिसून आलं आहे.
खासदार कोल्हेंनी शिरुर(Shirur Lok Sabha Constituency )साठी उमेदवारी पक्की होताच गुरुवारी ८ तारखेपासून दौरे मतदारसंघात पुन्हा सुरु झाले. ते त्यादिवशी हडपसर विधानसभा मतदारसंघात पूर्ण दिवस होते. मांजरी रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाचे काम आणि मांजरीच्या पाणीपुरवठा योजनेची पाहणी त्यांनी केली. १०६ फुट उंचावरील राष्ट्रध्वजाचे उद्गघाटन केले. तर, आज ते आंबेगाव विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर पूर्ण दिवस आहेत. पुढील काही दिवसांत इतर चार विधानसभांचेही ते दौरे करणार आहेत.
गेल्या काही महिन्यांतील तळ्यात मळ्यातील भूमिकेमुळे खुद्द अजित पवार( Ajit Pawar)हे सुद्धा खासदार कोल्हे यांच्याबाबत काहीसे साशंक होते. त्यात भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी शिरूरमधून लोकसभेला लढण्याची तयारी दाखवल्यानंतर अजितदादांनी पुण्यातील शिरूरच्या आढावा सभेत कोल्हेंना लढणार का असे थेट विचारले होते. त्यावर त्यांचे होकारार्थी उत्तर येताच शरद पवार यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली. तर, लांडे यांना त्यामुळे आपली लोकसभेची तलवार म्यान करावी लागली होती.
पुन्हा एकदा मामे - भाचे लढत होणार ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आमदार विलास लांडे यांनी २०२४ च्याच विधानसभेचे दार भोसरीतून किलकिलेही केले आहे. लोकसभेला डावलल्यानं त्यांचा विधानसभेला विचार होऊ शकतो अशी चर्चा त्यांच्या माघारीवर ऐकायला मिळाली. तसे झाले, तर पुन्हा एकदा मामा (विलास लांडे) आणि भाचे जावयात (आ. महेश लांडगे) भोसरीत विधानसभेला सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
नेता आणि अभिनेता म्हणून तारेवरची कसरत...
खासदार होण्याअगोदर डॉ.कोल्हे हे अभिनेते आहेत. त्यातही ते शंभूभक्त असल्याने त्यांच्यावरील महानाट्याचे प्रयोग ते राज्यातच नाही,तर राज्याबाहेरही करत आहेत. छत्रपती संभाजीमहाराजांवरील मालिकेचा फायदा २०१९ ला त्यांच्या विजयात झाला होता. ही मालिका आता बंद झाली असली,तरी त्यांचे महानाट्याचे प्रयोग सुरुच आहेत. त्यांच्यातील कलावंत त्यांना स्वस्थ बसू देत नाही.नेता आणि अभिनेता म्हणून तारेवरची कसरत त्यांना करावी लागते आहे. त्यातून त्यांच्यातील अभिनेता हा नेत्यावर भारी पडतो. त्यांनीही त्याची कबुली दिली आहे.
कोल्हेंच्या वक्तृत्वशैलीची मोदींकडून दखल....
त्यामुळेच विरोधक व त्यातही ज्यांचा त्यांनी गतवेळी पराभव केला,ते त्यांच्याविरुद्ध तक्रारी करीत आहेत. लोकांना खासदार भेटत नाहीत,असे त्यांचे म्हणणे आहे. हे काहीअंशी खरे असले,तरी त्यांची संसदेतील कामगिरी दमदार आहे. त्यासाठीचा संसदरत्न पुरस्कार त्यांनी पटकावलेला आहे. संसदेतील त्यांच्या वक्तृत्वशैलीची खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दखल घेतलेली आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.