Pune News: चोर, दरोडेखोर, गुंड यांच्याशी दोन हात करणारे पोलिस आपण नेहमीच पाहिले आहेत. परंतु कायद्याचे रक्षण करणारे हेच हात जर कायदा मोडू लागले तर काय होतं याचा प्रत्यय पुण्यातील एका घटनेने आला आहे. कर्मचाऱ्यांनी पोलिस स्टेशनमध्ये दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणात आता पुणे पोलिस दलातील चार पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. (Pune Police News)
पुण्यातील लोणी काळभोर पोलिस स्टेशनमध्ये हा प्रकार घडला. पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या दुचाकी विकण्याचा प्रताप केला. याप्रकरणी दयानंद गायकवाड, संतोष आंदुरे, तुकाराम पांढरे, राजेश दराडे या पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सोमवारी या चार पोलिस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची ऑर्डर पोलिस उपायुक्त यांनी जारी केली. मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यामध्ये एकाला अटक केली होती. या आरोपीची चौकशी केल्यानंतर धक्कादायक गोष्ट समोर आली. आरोपीने लोणी काळभोर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच आपल्याला काही दुचाकी परस्पर विकायला सांगितले, याचा खुलासा आरोपीने केला.
काही दिवसांपूर्वी उरुळी कांचन पोलिस चौकी हे स्वतंत्र ग्रामीण पोलिस स्टेशन झाल्यानंतर बिनधनी वाहने, चोरीची वाहने, गुन्ह्यातील, अपघातातील, विना नंबरची वाहने ही लोणी काळभोर पोलिस स्टेशन येथे स्थलांतरीत करायची होती. ही वाहने ठेवण्यासाठी लोणी काळभोर पोलिस स्टेशनला वनविभागाकडून जागा देण्यात आली आहे.
ही वाहने स्थलांतरीत करण्याचे काम बाळासाहेब घाडगे उर्फ बाळू याने केले. या दरम्यान बाळूने यातील काही वाहने त्यात दुचाकी वाहन बाजारात विकल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता लोणी काळभोर पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच काही दुचाकी परस्पर विकायला सांगितल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
आरोपीला या गाड्या स्क्रॅपच्या असल्याचे सांगत पोलिस कर्मचाऱ्याने बाजारात विकण्यास सांगितले होते. स्वत: च्या आर्थिक फायद्यासाठी आणि लाभासाठी या पोलिस कर्मचाऱ्यांनी आरोपीला ही गोष्ट करण्यास भाग पाडले होते. त्यामुळे या प्रकरणात या कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी वारंवार बोलावण्यात आले होते. मात्र त्यांनी चौकशीसाठी उपस्थिती लावली नाही. परिणामी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
(Edited By-Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.