IAS Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे दीड महिन्यांनंतर 'इन-चार्ज' : लाचखोरी झालेल्या 'अन्न व औषध'च्या प्रशासनात 12 वर्षांनंतर खमका अधिकारी

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. महेश झगडे यांच्या कार्यकाळानंतर विभागाला पुन्हा एकदा खमका आणि चर्चित अधिकारी मिळाला आहे.
IAS officer Tukaram Mundhe assumes charge as Maharashtra FDA Commissioner, reviving memories of former commissioner Mahesh Zagade’s impactful tenure.
IAS officer Tukaram Mundhe assumes charge as Maharashtra FDA Commissioner, reviving memories of former commissioner Mahesh Zagade’s impactful tenure.Sarkarnama
Published on
Updated on

IAS Tukaram Mundhe : प्रशासनाला धडकी भरवणाऱ्या IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा चार्ज घेतला. दीड महिन्यांपूर्वी त्यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदावरून आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागाचे सचिव म्हणून बदली केली होती. पण आईच्या निधनामुळे ते पदभार घेऊ शकले नव्हते.

या दरम्यान मुंढे यांची पदभार घेण्यापूर्वी पुन्हा बदली झाली. तेव्हापासून ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. शुक्रवारी (22 मे) रोजी त्यांची अन्न व औषध विभागाचे आयुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली. मुंढे यांच्या रुपाने जवळपास 12 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अन्न व औषध प्रशासनाला एक खमका अधिकारी मिळाला आहे. यापूर्वी महेश झगडे यांचा आयुक्तपदाचा कार्यकाळ राज्यभर गाजला होता.

काही दिवसांपूर्वी अन्न व औषध विभागात मंत्रालयातच लाचखोरीचे प्रकरण उघडकीस आल्याने सरकारची अक्षरशः लाज निघाली होती. शिवाय ऑनलाईन औषध विक्री, अन्न भेसळ प्रकरण, अधिकारी, रुग्णालय, औषध निर्माण आणि पुरवठादार कंपन्या, मेडिकल शॉप या सगळ्यांचे एकमेकांसोबतचे संगनमत चर्चेचा विषय ठरतो. यामुळेच तुकाराम मुंढे यांना आयुक्त म्हणून पाठवल्याची चर्चा आहे.

तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय आणि नियमांवर बोट ठेवून काम करणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. कठोर प्रशासकीय निर्णय घेणे, त्यांची काटेकोर अंमलबजावणी करणे ही त्यांची कामाची पद्धत आहे. त्यांच्या 'सरप्राईज व्हिजिट'ला कामचुकार अधिकारी नेहमीच घाबरून असतात. यापूर्वी त्यांनी काम केलेल्या प्रत्येक पदावर हेच दिसून आले आहे.

IAS officer Tukaram Mundhe assumes charge as Maharashtra FDA Commissioner, reviving memories of former commissioner Mahesh Zagade’s impactful tenure.
Tukaram Mundhe News: IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली: आता मंत्री नरहरी झिरवाळांच्या खात्याची जबाबदारी

महेश झगडे यांचीही ओळख प्रशासनात अशाच पद्धतीने होती. तेही त्यांच्या धडाडीच्या कामासाठी आणि धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ओळखळे जातात. ते 2011 ते 2014 या काळात अन्न व औषध प्रशासनचे आयुक्त होते. त्यांनी या काळात केवळ कायद्याची अंमलबजावणीच केली नाही, तर बलाढ्य कॉर्पोरेट कंपन्या आणि माफियांचं जाळं मोडीत काढलं होतं.

2011-12 या वर्षी घेतलेला गुटखा आणि पानमसाला बंदी हा महेश झगडे यांच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय होता. त्यांनी गुटख्यातील हानिकारक घटकांचा (मॅग्नेशियम कार्बोनेट) सखोल अभ्यास केला आणि अन्न सुरक्षा मानके कायद्याचा (FSSAI) आधार घेऊन महाराष्ट्रात गुटख्यावर पूर्णपणे बंदी घातली.

गुटखा बंदी लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले मोठे राज्य ठरले. बंदी घातल्यानंतर त्याची कडक अंमलबजावणी करण्यात महेश झगडे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. या निर्णयामुळे कोट्यवधी तरुणांचे आरोग्य वाचले. याच कार्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) त्यांना 'इंटरनॅशनल नो टोबॅको डे अवॉर्ड-२०१४' या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले.

जॉन्सन अँड जॉन्सन या बहुराष्ट्रीय कंपनीला भारतीय कायद्यासमोर झुकवणारे महेश झगडे हे पहिले अधिकारी ठरले होते. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या सदोष 'हिप इम्प्लांट'मुळे (खुब्याचे प्रत्यारोपण) रुग्णांना विषबाधा आणि अपंगत्व येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी कंपनीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आणि रुग्णांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली.

IAS officer Tukaram Mundhe assumes charge as Maharashtra FDA Commissioner, reviving memories of former commissioner Mahesh Zagade’s impactful tenure.
IAS Sheetal Teli-Ugale : पुणे विभागीय आयुक्तपदी शीतल तेली- उगले , अशी आहे प्रशासकीय कारकिर्द

अनेक औषध दुकाने केवळ परवान्यावर चालत होती, तिथे फार्मासिस्ट नसायचे. यामुळे रुग्णांना चुकीची औषधे मिळायची आणि त्याचा परिणाम थेट आरोग्यावर व्हायचा. झगडे यांनी हजारो दुकानांचे परवाने निलंबित केले किंवा रद्द केले. औषध क्षेत्रातील 'डॉक्टर-फार्मासिस्ट-दुकानदार' या साखळीतील भ्रष्टाचारावर त्यांनी प्रहार केला. "फार्मासिस्टशिवाय औषध नाही" ही मोहीम त्यांनी राज्यभर राबवली.

डॉक्टरांच्या 'कट प्रॅक्टिस' आणि महागड्या औषधांवर नियंत्रण आणण्यामध्येही झगडे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. डॉक्टर विशिष्ट कंपनीचीच महागडी औषधे लिहून देतात आणि त्या बदल्यात कंपन्यांकडून 'कट' घेतात, या प्रथेविरोधात त्यांनी कडक नियम केले. औषध कंपन्यांनी डॉक्टरांना दिलेल्या भेटवस्तू आणि ट्रिप्स यांवर त्यांनी कायदेशीर मर्यादा आणण्याचा प्रयत्न केला.

महेश झगडे यांनी तंबाखूमुक्त शाळा हा अभिनव उपक्रम राबवला होता. यानुसार, शाळा आणि महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर त्यांनी कडक बंदी आणली. यासाठी त्यांनी पोलीस विभागासोबत समन्वय साधून अनेक धाडी टाकल्या. आजही झगडे यांच्या कारकि‍र्दीची विभागात चर्चा असते.

थोडक्यात महेश झगडे यांच्या काळात अन्न व औषध प्रशासन हा विभाग केवळ परवाने देणारा विभाग न राहता, तो सामान्य जनतेच्या आरोग्याचे रक्षण करणारा एक 'सक्षम पहारेकरी' बनला होता. असं म्हणातात की, झगडे यांच्या बदलीनंतर औषध विक्रेत्यांनी पेढे वाटले होते, यावरून त्यांनी किती कौतुकास्पद काम केले याची जाणीव होते.

आता तुकाराम मुंढे हे त्यांची वेगळी काय स्ट्रॅटेजी प्लॅन करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com