
Mumbai News : राज्यातील शिक्षकांच्या प्रश्नावरून प्राथमिक शिक्षक संघ चांगलाच आक्रमक झाला आहे. शिक्षक संचमान्यतेमध्ये अनेक त्रुटी झाल्यामुळे राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त झाल्याने येत्या काळात विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे राज्यातील प्राथमिक शाळा विस्कळीत होणार आहेत. त्यामुळे या शिक्षकांच्या प्रश्नासाठी प्राथमिक शिक्षक संघ आता रस्त्यावर उतरणार असून त्यासाठी राज्यभर आंदोलन करणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने नुकत्याच सन 2024-2025 च्या शैक्षणिक वर्षासाठी मंजूर करण्यात आलेल्या शिक्षक संचमान्यतेमध्ये अनेक त्रुटी झाल्यामुळे राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार असून प्राथमिक शाळा विस्कळीत होणार आहेत. ही संच मान्यता दुरुस्त करणे गरजेचे आहे. शिक्षक संचमान्यतेमध्ये दुरुस्ती न झाल्यास व 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द नाही केल्यास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय सांगली येथे झालेल्या सिनिअर कौन्सिलमध्ये घेण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली.
2024-2025 या शैक्षणिक वर्षासाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक व माध्यमिक शाळेसाठी शिक्षक संच मान्यता ( शिक्षक पदनिर्धारण ) जाहीर केली आहे. ही संचमान्यता ऑनलाईन पद्धतीने झाली असली तरी यात अनेक चुका झाल्यामुळे राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांची पदे कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यात हजारोच्या संख्येने शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. या झालेल्या चुकामुळे राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
त्यासोबतच येत्या काळात अनेक शाळेतील 6 ते 8 च्या वर्गाला एकही शिक्षक मिळणार नाही. राज्यात नवीन संचमान्यतेमुळे निर्माण झालेली परिस्थिती, राज्यातील विविध शैक्षणिक समस्या व प्रश्नावर चर्चा करण्यासाठी शिक्षक संघाच्या सिनिअर कौन्सिलची राज्यस्तरीय बैठक शुक्रवारी सांगली येथे शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत मंगळवारी शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांची भेट घेऊन संच मान्यतेतील त्रुटी दुरुस्त कराव्यात, 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे. 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार शिक्षकाचे पद कमी झाले की पुन्हा निर्माण होण्याची संधीच राहिलेली नाही. त्यासोबतच पदवीधर व मुख्याध्यापक पदे निर्माण करण्यास अडचण निर्माण होणार आहेत.
या सिनिअर कौन्सिल सभेस नेते संभाजीराव थोरात, अध्यक्ष बाळासाहेब मारणे, आबासाहेब जगताप, बाळकृष्ण तांबारे, किसनराव इदगे, म. ज. मोरे, बळवंत पाटील, सचिन डिंबळे, संजय चेळेकर, मोहन भोसले, राजेंद्र जगताप, बब्रुवान काशीद, भक्तराज दिवाने, विनायक शिंदे, चंद्रकांत यादव, रविकुमार पाटील, अनिरुद्ध पवार, सुधाकर पाटील, अविनाश गुरव, लहू कांबळे, तात्या यादव, अशोक पवार उपस्थित होते.
राज्यव्यापी आंदोलन तीव्र करणार
शालेय शिक्षण विभागाने 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार संच मान्यता दिली आहे. हा शासन निर्णय शासकीय व अनुदानित शाळेवर अन्याय करणारा व स्वयं अर्थ साहाय्य तत्वावर चालणाऱ्या शाळेला पूरक असा आहे. शासकीय व अनुदानित शाळा बंद करून सर्वसामान्य जनतेच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याच धोरण शासन आखत आहे की काय ? असा संशय येत आहे. 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करून झालेली संच मान्यतेची दुरुस्ती नाही केल्यास प्राथमिक शिक्षक संघ राज्यव्यापी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.