NCP candidate announcement : अजितदादांची आघाडी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा
Pune News : सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असले तरी अद्याप महत्त्वाच्या राजकीय पक्षांची रणनीती नेमकी काय असणार आहे, याबाबत स्पष्टता आलेली नाही. राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष हे महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार का? याबाबत कोणताही निश्चित असा निर्णय झालेला नाही. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या स्थानिक नेत्यांमध्ये संभ्रम अवस्था आहे.
नेमकी आपल्याला उमेदवारी मिळणार का? आणि उमेदवारी मिळाल्यानंतर आपण पक्षाचे उमेदवार असणार की महायुतीचे याबाबत अनिश्चित असल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे. मात्र अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) राज्यातील पहिला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा उमेदवार जाहीर करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे मावळमधील आमदार सुनील शेळके यांनी पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या मावळमधील एका कार्यक्रमात त्यांनी या उमेदवाराबाबतची घोषणा केली आहे.
शनिवारी आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त “खेळ पैठणीचा सौभाग्यवती मावळ-2025 आणि लकी ड्रॉ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास आमदार सुनील शेळके उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांशी बोलताना आमदार सुनील शेळके यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आमदार शेळके यांनी चांदखेड गणातून पंचायत समितीकरिता माजी सरपंच मनोज येवले यांच्या पत्नी सुनिता मनोज येवले यांना उमेदवारी जाहीर करुन टाकली आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यातून पहिला स्थानिक स्वराज्य संस्थांचा उमेदवार मावळमधून जाहीर झाल्या असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मावळ पंचायत समितीकरिता पहिला उमेदवार जाहीर करीत असल्याचे सांगत आमदार सुनील शेळके यांनी चांदखेड गणातून सुनीता मनोज येवले यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली.
सभापती पदाचाही उमेदवार केला जाहीर
मावळ पंचायत समितीचे एकूण दहा गण असून यात यंदाचे पंचायत समितीचे सभापती पद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित आहे. त्यासोबतच चांदखेड गण हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी आरक्षित आहे. त्यामुळे पंचायत समितीचा पहिला उमेदवार जाहीर करण्यासोबत आमदारांनी सभापती पदाचाही उमेदवार जाहीर केल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

