

Pune News: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या व भाजपच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील-ठाकरे यांनी युवा मोर्चाच्या संघटनेची सुत्रे हातात घेताच पक्ष संघटना मजबूत करण्यास जोरदार सुरवात केली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी दौऱ्याला सुरवात केली आहे. त्यामुळे अंकिता पाटलांनी बारामती लोकसभामतदारसंघात लक्ष घातलंय का ? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
अंकिता पाटील यांनी रविवारी बारामती शहरातील भाजप कार्यालयाला भेट देत युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच बारामती शहरातील काही गणेशोत्सवाच्या मंडळांना भेटीही दिल्या. यानंतर डोर्लेवाडी, माळेगाव परीसरातील गणेश उत्सव मंडळाला भेटी देवून आरतीच्या कार्यालयाला हजेरी लावली. याबरोबरच बारामतीतील दौऱ्यानंतर पुण्यातील भाजपची महत्वाची बैठक आटोपून खडकवासला मतदारसंघातील गणपती मंडळाच्या कार्यक्रमालाही त्यांनी हजेरी लावली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंकिता पाटलांकडे भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघातील युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पद दिले आहे. अंकिता पाटील यांनी निवडीनंतर तातडीने बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे त्यांचे 'मिशन बारामती' आहे का ? याबाबत आता तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपचे सरकार सलग तिसऱ्यांदा २०२४ मध्ये सत्तेवर येणार आहे, असा दावा करत मोदींनी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत", असं अंकिता पाटील म्हणाल्या.
लोकसभा निवडणुकीत देशात भाजप ३०० पेक्षा अधिक जागा जिंकेल. तर बारामती लोकसभा मतदारसंघाचा आगामी खासदार भाजपचा असेल, असा विश्वासही अंकिता पाटलांनी व्यक्त केला. तसेच राज्यातही महायुतीचे सरकार चांगले काम करत असून याचा फायदा लोकसभा निवडणुकीत होणार असल्याचे अंकिता पाटील यांनी सांगितले.
सोमवारी पुण्यात जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीलाही त्या उपस्थित राहिल्या. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत बावधनमध्ये एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. यानंतर खडकवासल्यातील दहा गणेश मंडळांना भेटी दिल्या.
सुप्रिया सुळे अन् अंकिता पाटील आल्या समोरासमोर...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव सुधीर पाटसकर यांच्या वडिलांचे काही दिवसापूर्वीच निधन झाले. पाटसकर कुंटूबाचे सांत्वन करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे रविवारी पाटसकरांच्या घरी आल्या होत्या. यावेळी भाजपच्या अंकिता पाटीलही पाटसकरांच्या घरी आल्या होत्या. याचवेळी सुप्रिया सुळे आणि अंकिता पाटील काहीवेळ समोरासमोर आल्या. त्यानंतर दोघींनीही एकमेकांना स्मित हास्य करून पुढील दौऱ्यासाठी रवाना झाल्या.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.