Pimpri Chinchwad : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षाच्या इन्कमिंग आणि आऊटगोईंगने जोर धरला आहे. पुढची राजकीय गणितं मनात बांधून इच्छुकांनी आपला पक्ष, मतदारसंघाबाबत ठोस भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचा पिंपरी चिंचवडचा प्रमुख चेहरा आणि अजित पवारांचे अत्यंत विश्वासू शिलेदार असलेल्या संजोग वाघेरे उद्धव ठाकरेंच्या गोटात जाण्याची शक्यता आहे.
आगामी लोकसभेला मावळातून महायुतीचा (शिंदे शिवसेना) उमेदवार ठरल्यात जमा आहे. तेथील विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनाच पुन्हा तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे.तर, त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून महाविकास आघाडीचा (ठाकरे शिवसेना) उमेदवार मात्र, आयात असेल,असे संकेत मिळाले आहेत.
मावळात बारणेंना पुरुन उरेल असा उमेदवार ठाकरे शिवसेनेकडे तूर्तास नाही. त्यामुळे तेथे तो ते आयात करण्याची शक्यता आहे. तशा हालचालीही सुरु झाल्या आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपचे माजी नगरसेवक आणि बिल्डर संदीप वाघेरे हे ठाकरे शिवसेनेचे मावळातील उमेदवार असतील,अशी चर्चा पूर्वीच झाली आहे. त्यांनी लोकसभा लढण्याची तयारीही सुरु केली आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त नुकतेच त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले. लोकसभा मावळातून लढणार हे त्यांनी सांगितलेही आहे, पण कुठल्या पक्षाकडून हे त्यांनी गुपित ठेवले आहे.
दरम्यान, संदीप वाघेरे यांच्या नावाच्या चर्चेवरील धूळ खाली बसते नाही तोच सोमवारी (ता.25 ) पिंपरीतील ठाकरे शिवसेनेचे मावळातील लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून पिंपरीतील दुसऱ्या वाघेरेंच्या नावाची चर्चा झाली.ते आहेत माजी महापौर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे (Sanjogh Waghere) सध्या ते अजित पवार गटात आहेत. मावळ तयारीच्या मातोश्रीवरील शिवसेनेच्या आजच्या बैठकीपूर्वी त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
यावेळी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत, पक्षाचे राज्य संघटक एकनाथ पवार,पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, माजी शहरप्रमुख योगेश बाबर उपस्थित होते. शिवसेनेकडून लढण्यास इच्छूक असल्याचे वाघेरेंनी यावेळी ठाकरेंना सांगितले. त्याला त्यांनी स्वत या भेटीनंतर मुंबईतून 'सरकारनामा'शी बोलताना दुजोरा दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिरुर लोकसभेला विद्यमान खासदार आणि आघाडीचे संभाव्य उमेदवार डॉ.अमोल कोल्हेंविरोधात तगडा प्रतिस्पर्धी म्हणून युतीतील अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी ही तेथील तीन टर्मचे खासदार आणि शिंदे शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव यांना आपले उमेदवार म्हणून उतरविण्याची चर्चा आहे. दमदार उमेदवार आयात करण्याची ही पुनरावृत्ती मावळातही होण्याची शक्यता आहे. तशा हालचालीही सुरु झाल्या आहेत. ठाकरे शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनीही त्याला दुजोरा दिला.
शिरुरमधून लोकसभेला महायुतीकडून (अजित पवार राष्ट्रवादी) इच्छुक असल्याचे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी सोमवारी जाहीर केले. ते भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांचे मामा आहेत. तर, आजच मावळातही संजोग वाघेरे यांनी आपण आघाडीकडून इच्छुक असल्याचे सांगितले.
ते ही आमदार लांडगेंचे मामाच आहेत. त्यामुळे त्यांच्या कुठल्या मामाला मावळात लॉटरी लागणार याची खमंग चर्चा पिंपरी-चिंचवडमध्ये लगेच रंगली.दरम्यान,योगेश बाबर यांनी सुद्धा मावळातून इच्छुक असल्याचे आजच्या मुंबईतील पक्षाच्या मावळ तयारीच्या बैठकीनंतर सांगितले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.