

Pune News : महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांना अडीच वर्षांऐवजी थेट पाच वर्षांच्या मुदतीचे नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आल्याने भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाने आधी अडीच वर्षांचा शब्द दिल्याने पुढील संधीची अपेक्षा बाळगणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.
महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये स्वीकृत नगरसेवकपदासाठी प्रचंड इच्छुकांची गर्दी होती. अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांची उमेदवारी कापल्याने पक्षात नाराजीची लाट पसरली होती. त्यामुळे निवडणुकीनंतर उमेदवारी नाकारलेल्या कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्याचा निर्णय घेण्यात आला.
भाजपकडून नीलेश कोंढाळकर, राजेंद्र काकडे, रवींद्र साळेगावकर, विश्वास ननावरे आणि उदय लेले यांना संधी देण्यात आली. तसेच जयप्रकाश पुरोहित आणि प्रियांका शेंडगे यांच्यासाठी नव्याने प्रक्रिया राबवली जाईल. काँग्रेसकडून सुनील शिंदे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दत्ता धनकवडे आणि राकेश कामठे यांना संधी मिळाली आहे.
भाजपने (BJP) स्वीकृत नगरसेवक पदासाठी ४०० हून अधिक इच्छुक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे प्रत्येकाला अडीच वर्षांचा कालावधी देऊन पाच वर्षांत १४ जणांना संधी देण्याचा विचार होता. पराभूत उमेदवारांना मात्र यात स्थान नसल्याचे पक्षाने स्पष्ट केले होते. त्यानुसार सात जणांची निवड करण्यात आली आणि त्यातील पाच जणांची नावे जाहीरही करण्यात आली.
मात्र, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी या पाच जणांना अडीच वर्षांऐवजी थेट पाच वर्षांचे नियुक्ती प्रमाणपत्र दिले. यामुळे ज्यांना यावेळी संधी मिळाली नाही, त्यांना पुढील पाच वर्षांतही स्वीकृत नगरसेवक पदाची आशा मावळली आहे. यापूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी अडीच वर्षांचा कार्यकाल आणि 14 जणांना संधी देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे नाकारलेल्या इच्छुकांना पुढील वेळी संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र आता आयुक्तांच्या निर्णयामुळे पक्षांतर्गत नाराजी अधिक वाढली आहे.
महापालिकेतील 10 जागांसाठी पहिल्यांदाच 800 इच्छुक दाखल झाल्याचे समोर आले आहे. यात एकट्या भाजपकडून 400 इच्छुक होते. स्थानिक नेत्यांनी केलेल्या निवडीतून पाच जणांना संधी मिळाली, परंतु पाच वर्षांच्या प्रमाणपत्रामुळे उर्वरित इच्छुकांना मोठा धक्का बसला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.