Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना भटकती आत्मा असा उल्लेख करत ज्येष्ठ नेते शरद पवारांवर टीका केली होती.यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासह महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींकडून मोदींच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला जात आहे.
त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील पंतप्रधान मोदींच्या त्या टीकेवर जोरदार पलटवार केला आहे. जशी भटकती आत्मा असते तसेच वखवखलेला आत्मादेखील असतो. आणि तो वखवखलेला आत्मा सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे असे म्हणत ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला.
महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि पुणे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी पुण्यात मंगळवारी (ता.30) सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) त्यांच्या नेहमीच्या आक्रमक शैलीत भाजपवर तुटून पडले. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढच्या वेळेस मी पंतप्रधानांना भेटल्यावर भटकती आत्मा ते कोणाला म्हटले हे विचारणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र, पंतप्रधान पवारसाहेबांना भटकती आत्मा म्हटले आहेत.
पण जशी भटकती आत्मा असते तसाच वखवखलेला आत्मा देखील असतो. आणि तो वखवखलेला आत्माच संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे. तब्बल 20 सभा घेणार आहेत. मात्र, महाराष्ट्रात फिरत असताना तुमच्या धोरणांमुळे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या आत्म्याकडे पाहा अशी खोचक टीका ठाकरे यांनी केली.
ठाकरे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आज हुतात्मा स्मारककडे रात्री जाणार आहे. ते हुतात्मे आता बघत आहेत की, आपण कोणासाठी बलिदान दिले आहे. मात्र, महाराष्ट्रामध्ये जो हूकमशहा फिरत आहे. त्याच्या हातामध्ये महाराष्ट्र जाऊन देणार नाही असेही त्यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ठाकरे म्हणाले,काल पुण्यात नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची सभा होती. त्यांच्या सभेला रेसकोर्स हे ठिकाण योग्य होतं. कारण झोपेत सुद्धा त्यांना घोडे बाजार दिसतो. पण तुम्ही ज्यांना घोडे म्हणून घेतलं आहेत ते घोडे नाहीत खेचर आहेत . खरे घोडे हे अश्वमेधाचे असतात, रथाचे असतात. टरबुजाला घोडा लागत नाही तर हातगाडी लागते असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) डिवचलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 2014 आणि 2019 ला सभा घेतल्या त्यावेळी त्यांना इतक्या महाराष्ट्रात सभा घेण्याची गरज पडली नव्हती. या सभांमध्ये ते मला लहान भाऊ म्हणत होते. मग मी जर लहान भाऊ होतो तर नातं का तोडलं असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
ठाकरे पुढे म्हणाले, असाच एक वखवखलेला आत्मा साडेतीनशे वर्षांपूर्वी गुजरातमध्ये जन्माला आला होता. तो व्हाया आग्रा महाराष्ट्रात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य चिरडून टाकण्यासाठी तो महाराष्ट्रात आला होता. 27 वर्ष औरंगजेब आग्रा सोडून महाराष्ट्रामध्ये आला आणि त्याने पुन्हा आग्रा बघितलाच नाही. त्याचा आत्मा आता इकडेच कुठेतरी भटकत असेल. त्यामुळे अशी वख वख बरी नाही अशी टीका ठाकरे यांनी केले.
अजित पवार यांचे नाव न घेता ज्याने बोट धरून चालायला ,शिकवले त्यांना लाथा मारायच्या का? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.