

Khed APMC Election: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील आणि उपसभापती क्रांती सोमवंशी यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्यानंतर तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या राजीनाम्यांमुळे रिकाम्या झालेल्या सभापती व उपसभापती पदांची निवडणूक मंगळवारी (२८ जुलै) पार पडणार असून, नवी सत्तासमीकरणे जुळवण्यासाठी तीव्र राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संचालकांची फोडाफोडी टाळण्यासाठी त्यांना अज्ञात स्थळी 'राजकीय सहलीवर' पाठवण्यात आल्याच्या चर्चा सुरू आहेत.
२०२३ मध्ये झालेल्या खेड बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत तत्कालीन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने १८ पैकी ११ जागांवर विजय मिळवत सत्ता हस्तगत केली होती. ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादीचे कैलास लिंभोरे सभापती, तर विठ्ठल वनघरे उपसभापती झाले.
मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा राजीनामा घेण्यात आल्यानंतर बाजार समितीत मोठे राजकीय नाट्य घडले. मोहिते पाटील यांच्या गटातील ४ संचालक राष्ट्रवादीचे ३ व १ अपक्ष फुटून विरोधकांना जाऊन मिळाले. या विरोधकांच्या एकजुटीचे नेतृत्व विजयसिंह शिंदे पाटील यांनी केले. त्यामुळे विरोधी सर्वपक्षीय पॅनलचे संख्याबळ ११ वर पोहोचले, तर मोहिते गटाचे संख्याबळ ७ वर घसरले. या नव्या समीकरणातून विजयसिंह शिंदे पाटील सभापती, तर क्रांती सोमवंशी उपसभापतीपदी विराजमान झाले होते.
या राजकीय फेरबदलानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयसिंह शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखालील बाजार समिती संचालक मंडळाच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार बाबाजी काळे आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर पार पडलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत सभापती शिंदे पाटील हे स्वतः जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. आमदार बाबाजी काळे यांच्यासह सर्व घटकांच्या मदतीने ५ जिल्हा परिषद सदस्यांसह या गटाला पंचायत समितीच्या सभागृहात स्पष्ट बहुमत मिळाले.
पाच वर्षांतील सत्तानाट्य
एकाच टर्ममध्ये पक्षीय संख्याबळाची गणिते बदलत कैलास लिंभोरे ते विजयसिंह शिंदे पाटील असा प्रवास केलेल्या खेड बाजार समितीत आता तिसऱ्या टप्प्यातील सभापती निवडीचा अंक सुरू झाला आहे.
आता नवीन सभापती कोण?
बाजार समितीच्या सभापती पदाची संधी मिळण्यासाठी इच्छुकांची मोठी फळी तयार आहे. ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार शिंदे पाटील व सोमवंशी यांनी राजीनामे दिले असले, तरी या प्रक्रियेला उशीर झाल्याने उर्वरित कालावधीत किती संचालकांच्या गळ्यात पदाची माळ पडणार, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, मंगळवारी होणाऱ्या मतदानापूर्वी विरोधी गटाकडून कसलीही 'फोडाफोडी' होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून सत्ताधारी गटाच्या संचालकांना 'नॉट रीचेबल' करत रिसॉर्टवर हलवण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस (मोहिते गट) आपली सत्ता पुन्हा खेचून आणणार की आमदार बाबाजी काळे व विजयसिंह शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय गट आपला गड राखणार, याकडे संपूर्ण खेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.