Pune News : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. ते शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. पण अद्याप या मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यापूर्वीच शिरोळे यांनी राजीनामा दिला आहे.
विधानसभा निवडणुकीत मनसेने एकला चलो ची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील 288 पैकी तब्बल 250 जागांवर उमेदवार देणार असल्याचं यापूर्वी मनसेकडून सांगण्यात आला आहे. मनसेकडून उमेदवारांच्या तीन याद्या देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. या याद्यांमध्ये पुण्यातील कोथरूड, हडपसर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघांच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे.
पुण्यातील इतर पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसे उमेदवार देणार आहे का? की मनसेचा महायुतीच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा असणार आहे, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. या मतदारसंघात मनसे उमेदवार देण्याची शक्यता कमी असल्याने इच्छुकांमध्ये नाराजी असल्याचे देखील बोलले जात आहे. या पार्श्वभूमी वर पुण्यातून मनसेचा पहिला राजीनामा आल्याचा पाहिला मिळत आहे.
राजीनाम्याबाबत बोलताना रणजित शिरोळे म्हणाले, मी आजपर्यंत मनसे स्थापन झाल्यापासून पक्षासोबत काम करत आहे. पक्षाने मला अनेक जबाबदाऱ्या दिल्या. त्या मी अत्यंत उत्तमपणे निभावल्या आहेत. मनसेकडून मी लोकसभेची आणि एक विधानसभेची निवडणूक देखील लढवली आहे. मी राज ठाकरेंवर अथवा मनसेतील इतर कोणत्याही नेत्यांवर नाराज नाही.
मी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. निवडणूक फॉर्म देखील घेऊन आलो आहे. मात्र निवडणूक लढणार की नाही, याबाबत निर्णय घेतलेला नाही. मी मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सरचिटणीस पदाचा राजीनामा देत आहे. माझी कोणतीही नाराजी नाही. मला कोणत्याही पक्षाची ऑफर नाही. मात्र पुढील दोन दिवसांनी माझी राजकीय भूमिका स्पष्ट करेल, असे शिरोळेंनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.