

Pune News: राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला आता वेग येणार असून मुलाखतीसह तब्बल १० हजार शिक्षकांची पदे भरण्याची प्रक्रिया पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत आतापर्यंत रूपांतरण फेरीमध्ये सुमारे ४ हजार ३२० शिक्षकांची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी ही प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.
शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत या भरती प्रक्रियेबाबत माहिती दिली. मुलाखतीशिवाय शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू असतानाच आता मुलाखतीसह पदभरतीचा टप्पाही सुरू केला जाणार आहे. त्यामुळे पुढील काही आठवड्यांत मोठ्या प्रमाणावर शिक्षकांना नियुक्ती मिळण्याची शक्यता आहे.
पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरती प्रक्रियेतील दुसऱ्या टप्प्यात रूपांतरण फेरीत ४ हजार ३२० शिक्षकांची शिफारस करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार उपलब्ध पदांवर नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू आहे. कागदपत्रांची पडताळणी आणि अन्य आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदांच्या १३ हजार २२५ पदांपैकी यापूर्वी ४ हजार ८४७ उमेदवारांची शिफारस झाली होती. आता आणखी ३ हजार १०५ उमेदवार उपलब्ध झाल्याने एकूण ११ हजार ८५८ शिक्षक रुजू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर नगरपालिका आणि महापालिकांच्या रिक्त पदांची प्रक्रियाही पुढे नेण्यात येत आहे.
मुलाखतीसह होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये उमेदवारांचे मूल्यमापन १०० गुणांवर केले जाणार आहे. यामध्ये टीईटी, शैक्षणिक तसेच व्यावसायिक पात्रतेवर आधारित स्वयंघोषित पद्धतीने निश्चित होणारे गुण विचारात घेतले जाणार आहेत. मुलाखतीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची माहिती पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यास मदत होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, मुलाखतीसह शिक्षक भरतीमध्ये उपलब्ध पदांची माहिती घेऊन उमेदवारांची प्रक्रिया पुढे नेली जाणार आहे. मात्र, संबंधित संस्थांनी चुकीच्या पद्धतीने शिक्षक भरती केल्याचे आढळल्यास संबंधित संस्थांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिला आहे.
मुलाखतीसह शिक्षक भरतीमध्ये काही शाळा व्यवस्थापनांकडून नियमबाह्य पद्धतीने निवड केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर लक्ष ठेवण्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांच्या रिक्त जागांचे प्रमाण अधिक आहे, अशा ठिकाणी भरती प्रक्रियेवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
भरती प्रक्रियेत पात्र उमेदवारांची माहिती पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना आपल्या पात्रतेनुसार कोणत्या पदासाठी आणि कोणत्या संस्थेसाठी संधी उपलब्ध आहे, याची माहिती मिळणार आहे. कागदपत्रांची पडताळणी, नियुक्ती आणि पदस्थापनेची प्रक्रिया निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो उमेदवारांसाठी पुढील आठवडे निर्णायक ठरणार आहेत. मुलाखतीसह १० हजार पदांची भरती प्रत्यक्षात किती वेगाने पूर्ण होते, याकडे आता शिक्षक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.