

VBA News : आपल्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या एमपीएससी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करणे ही सरकारची मग्रुरी असून, विद्यार्थ्यांवरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली आहे.
पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर एमपीएससी विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी केलेल्या आंदोलनानंतर त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे.
वंचितचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याऐवजी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न फडणवीस सरकार करत आहे.
पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल प्रमोद पाटील, अक्षय कांबळे, ऋषिकेश गांगुर्डे आणि प्रियंका चौधरी यांच्यासह एकूण 15 विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
एमपीएससी परीक्षांमधील कथित गैरप्रकार, पेपरफुटीचे आरोप, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता आणि आयोगाच्या कारभाराबाबत उपस्थित होणारे प्रश्न गंभीर आहेत. या सर्व प्रकरणांची पारदर्शक चौकशी करून जबाबदारी निश्चित करणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात असतील, तर हा लोकशाहीतील विरोधाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न असल्याचे राजेंद्र पातोडे यांनी म्हटले आहे.
विद्यार्थ्यांना न्याय मागण्याचा आणि आपल्या प्रश्नांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून तोडगा काढण्याऐवजी कायद्याचा धाक दाखवणे, ही सरकारच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांकडे दुर्लक्ष करून हा प्रश्न संपणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वंचित बहुजन आघाडीने विद्यार्थ्यांवरील दाखल गुन्हे तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे. तसेच एमपीएससी अध्यक्ष विवेक भिमनवार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, परीक्षा प्रक्रियेतील कथित पेपरफुटी आणि अनियमिततेची चौकशी करावी आणि विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी पातोडे यांनी केली.
विद्यार्थी हे महाराष्ट्राचे आणि देशाचे भविष्य आहेत. त्यांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार कोणत्याही सरकारला नाही. सरकारने दडपशाहीचा मार्ग सोडून संवादाचा मार्ग स्वीकारावा. अन्यथा, सरकारला विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या आमदार आणि खासदारांनी आता केवळ पुण्यात उपस्थित राहण्यापुरते मर्यादित न राहता मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन सुरू करावे, असे आवाहन राजेंद्र पातोडे यांनी केले.
विद्यार्थ्यांचे आंदोलन त्यांच्या मूळ मागण्यांवर केंद्रित राहिले पाहिजे. आंदोलनाचे नेतृत्व किंवा दिशा बदलून ते हायजॅक होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या मागण्यांना केंद्रस्थानी ठेवूनच पुढील आंदोलनाची दिशा ठरवली पाहिजे, असेही पातोडे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.