

Pune, 12 February : पुणे जिल्हा परिषद आणि आंबेगाव पंचायत समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत यश मिळविले आहे. पंचायत समितीच्या जारकरवाडी गणातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून अंकिता अनिल वाळुंज यांनी शिवसेनेचा १५ वर्षांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करून घड्याळाचा गजर केला आहे. अवघ्या २२ वर्षांच्या अंकिता वाळुंज ह्या सर्वांत तरुण पंचायत समिती सदस्या ठरल्या आहेत.
पुणे जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने बहुतांश ठिकाणी एकत्र निवडणूक लढवली होती. मात्र, आंबेगावात (Ambegaon) दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने आल्या होत्या. पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जारकरवाडी गणातून अंकिता वाळूंज या सर्वांत तरुण उमेदवाराला निवडणुकीला उतरविण्यात आले होते.
जारकरवाडी गणात मागील तीन पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार निवडून आलेला आहे, त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या गणात राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) अवघ्या २२ वर्षांच्या तरुणीला निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले होते. अंकिता वाळुंज यांनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात घड्याळा गजर केलेला आहे.
अंकिता वाळुंज यांनी नुकतीच बी. फार्मसी पदवी मिळविली असून सध्या त्या एमबीएच्या पहिल्या वर्षात शिकत आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेच्या घड्याळावर निवडणूक लढवली आहे. त्यांची लढत प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रोहिणी दिलीप वाळुंज यांच्या बरोबर झाली.
रोहिणी वाळुंज या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांचे जवळचे नातेवाईक आहेत. त्यामुळे या लढतींकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. अंकिता वाळुंज यांना ६७४६ मते मिळाली, तर पराभूत रोहिणी वाळुंज यांना ६१९८ मते मिळाली. भाजपच्या शैला भोजने यांना ७३४ मते पडली आहेत.
श्वेता ढोबळेंनी राष्ट्रवादीचा गड केला सर!
दुसरीकडे, पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक-जारकरवाडी गटातील पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक गणातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या श्वेता ढोबळे निवडून आल्या आहेत. त्यांचे साधेपण मतदारांना भावले असून सहज उपलब्ध होणाऱ्या म्हणून मतदारांनी त्यांना निवडून दिल्याचे दिसून येते. त्यांनी राष्ट्रवादीच्या सुनंदा ढोबळे यांचा पराभव केला. या गणातून कायम राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी व्हायचा. पण ढोबळे यांनी राष्ट्रवादीचा तो गड सर केला आहे.
विवेक वळसे पाटील अध्यक्षपदाच्या शर्यतीत
पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक- जारकरवाडी गटात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणून आले आहेत. ते जिल्हा परिषदेला आतापर्यंत दोनदा निवडणून आले आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केलेले आहे, त्यामुळे विवेक वळसे पाटील हे अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.