

Pune News : पुण्यातील विवाहिता पायल झांबरे हिच्या आत्महत्येच्या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली असतानाच आता या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः लक्ष घातले आहे. पायलच्या आईसह काका-काकूंशी फोनवरून संवाद साधत त्यांनी कुटुंबीयांना धीर दिला. ‘तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्याच पाठीशी आहे. या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही,’ असा ठाम शब्द शिंदे यांनी कुटुंबीयांना दिला. त्यासोबतच पायलला न्याय मिळवून देण्यासाठी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासह सर्वतोपरी कायदेशीर मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून पायलने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणी पायलचा पती, सासू आणि सासरे यांना अटक करण्यात आली आहे. तर नणंद अक्षता झांबरे-निम्हण हिच्याविरोधातही गुन्हा दाखल असून, तिच्या अटकेबाबत पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी पायलच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. पायलबाबत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. शिवसेना परिवार तुमच्या पाठीशी आहे. या प्रकरणाचा आम्ही पाठपुरावा करू. पायलला न्याय मिळवून देऊ असा विश्वास त्यांनी दिला. तसेच हा खटला फास्ट ट्रॅकवर चालविण्यासाठी स्वतः लक्ष घालणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महिलांचा छळ करणाऱ्यांमध्ये कायद्याचा धाक निर्माण झाला पाहिजे आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी दोषींना कठोर शिक्षा होणे आवश्यक असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, पायलच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. सर्व संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि सरकारी वकील म्हणून राजेश कावडीया यांची नियुक्ती करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. तसेच आरोपींची मालमत्ता सील करावी आणि दोषींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी भूमिका कुटुंबीयांनी मांडली.
कुटुंबीयांच्या या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत शिंदे यांनी त्यांना हवा असलेला राजेश कावडीया हा वकील उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. न्यायालयीन लढाई लढताना कुटुंबीयांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी वकिलांच्या नियुक्तीपासून खटल्याच्या संपूर्ण प्रक्रियेपर्यंत शिवसेनेच्या वतीने कायदेशीर आणि आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
'या प्रकरणात मी स्वता वैयक्तिक लक्ष घालणार आहे. मुख्यमंत्री आणि शासनही कुटुंबीयांच्या पाठीशी असून, एकाही दोषीला सोडले जाणार नाही,’ असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी दिल्याने पायलच्या कुटुंबीयांना न्यायाच्या लढाईत मोठा आधार मिळाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.