थोडक्यात बातमी :
शरद पवार यांची भेट आणि संरक्षण:
अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाड यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्या शिफारसीनुसार शासनाकडून सुरक्षा घेतली.
संभाजी ब्रिगेड एकत्र येण्याची प्रक्रिया:
सामाजिक आणि राजकीय संभाजी ब्रिगेड पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असून, मराठा सेवा संघाच्या अधिवेशनांमध्ये यावर चर्चा झाली आहे.
संघटनेची भूमिका आणि राजकारणाबाबत भूमिका स्पष्ट:
संभाजी ब्रिगेड ही मुख्यतः सामाजिक संघटना असून, राजकीय यश न मिळाल्यामुळे त्यावर पुन्हा विचार केला जाऊ शकतो; नेतृत्वाच्या भूमिकेबाबत गायकवाड यांची लवचिक भूमिका.
Pune News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रआत दोन ठाकरे बंधूंसह दोन्ही राष्ट्रवादीही काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत.यातच आता संभाजी ब्रिगेडमध्ये तयार झालेले दोन गट एकत्र येतील, अशी शक्यता सुरू आहे. या पार्श्वभूमीवरती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पण या भेटीनंतर त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाविषयी मोठा दावा केला आहे.
पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना प्रवीण गायकवाड म्हणाले, 12 जुलैला माझ्यावर अक्कलकोट येथे हल्ला करून वंगण तेल टाकण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता पसरली असून अनेक लोकांनी मला काळजी घेण्यासाठी सांगितले होते. त्यात शरद पवार यांनीही काळजी घेण्यासाठी सांगितले होते. तसेच सध्याच्या परिस्थितीत मी संरक्षण घ्यावे, असे शरद पवार यांचे मत होते. त्यानुसार शरद पवार (Sharad Pawar) यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. कारवाई करून सरकारकडून मला संरक्षण देण्यात आलं असून ते मी घेतलं असल्याचं प्रवीण गायकवाड यांनी सांगितलं .
शरद पवार यांच्याशी झालेल्या भेटीबाबत अधिक माहिती देताना प्रवीण गायकवाड म्हणाले, महाराष्ट्रात सध्या अस्वस्थता पसरली आहे पुरोगामी आणि प्रतिगामी असा संघर्ष उभा राहिला असून या संघर्षाची तीव्रता लक्षात आणून देण्यासाठी शरद पवार यांची भेट घेतली असल्याचं गायकवाड म्हणाले.
यवत हिंसाचार प्रकरणावर बोलताना गायकवाड म्हणाले, महाराष्ट्र आणि देशात जाती, समूहात संघर्ष उभा राहिला आहे. हा संघर्ष लोकशाही मध्ये अपेक्षित नाही. आपल्याकडे वेगवेगळे समुदाय आणि धर्म आहे. समाजांमध्ये आपापसात संवाद असला पाहिजे. पण, २०१४ नंतर महाराष्ट्रात जात, वर्ग, धर्म यांच्यात संवाद राहिला नाही. याला अनेक कारणे आहेत. वेगवेगळ्या प्रकारचा द्वेष राज्यात पसरवला जातो.
समाजमाध्यमातून पोस्टमधून द्वेष पसरतो त्यामुळे नागरिक आणि कार्यकर्त्यांनी जबाबदारीने समाजमाध्यमाचा वापर केला पाहिजे. आपण कुठल्याही माध्यमातून व्यक्त होत असलो तर त्यातून कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, हे पाहिले पाहिजे. शांतता प्रस्थापित झाली पाहिजे.
दोन संभाजी ब्रिगेड एकत्र त्यावर बोलताना गायकवाड म्हणाले, 2014 मध्ये मी संभाजी ब्रिगेड सामाजिकचा अध्यक्ष होते. नंतर मी राजीनामा दिल्यावर मनोज आखरे हे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष झाले. 2016 मध्ये संभाजी ब्रिगेड हा राजकीय पक्ष झाला. संभाजी ब्रिगेड ही राजकारण विरहित तरूणांची संघटना आहे. जी शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करते.
परंतु,2016 मध्ये राजकारणात आल्यावर ब्रिगेडने स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा निवडणुका लढल्या. पण, गेल्या सहा महिन्यांपासून सामाजिक आणि राजकीय संभाजी ब्रिगेड एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली. याचे कारण सौरभ खेडकर हे पुरूषोत्तम खेडेकर यांचे चिरंजीव आहे. सौरभ खेडेकर यांनी महाराष्ट्रात मराठा जोडो अभियान काढले होते. तेव्हा, राजकीय आणि सामाजिक संभाजी ब्रिगेड एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यानंतर अकलूज मध्ये मराठा सेवा संघाच्या अधिवेशनात देखील याबद्दल चर्चा झाली. अक्कलकोट येथे माझ्यावर हल्ला झाल्यानंतर या प्रक्रियेला गती मिळाली.
बुलढाणा चिखली येथे पुरूषोत्तम खेडेकर यांच्यासह मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. संभाजी ब्रिगेड सामाजिक आणि राजकीय एकत्र येतील. आम्ही एकाच विचाराने काम करतो. आमच्यासमोर शिवराय, शाहू, फुले आणि आंबेडकरांची विचारधारा आणि राज्यघटनेच्या समता, न्याय, बंधूता तत्व एकच असल्याने मिळून कामे करावे, अशी सगळ्यांची इच्छा आहे.
मराठा सेवा संघाच्या परिवाराचा एक भाग म्हणजे संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड असे 32 कक्ष आहेत. त्यातील प्रमुख बॉडी ही मराठा सेवा संघ आहे. पुरूषोत्तम खेडेकर यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. ताकद विभागल्यामुळे राजकीय यश मिळत नाही आणि सामाजिक दबावही राहत नाही.
सांस्कृतिक, सामाजिक दबाव संभाजी ब्रिगेडचा मूळ विषय आहे. राजकारण विरहित संघटना हा मुख्य उद्देश आहे. राजकारण की समाजकारणात पुढे जायचे, याचा निर्णय मराठा सेवा संघ घेणार आहे. परंतु, राजकारण हे गरजेचे आहे. राजकारणात संभाजी ब्रिगेडला यश न मिळाल्याने त्यावर पुर्नविचार होऊ शकतो.
संभाजी ब्रिगेडचा मी प्रदेशाध्यक्ष राहील, असे नाही. संभाजी ब्रिगेडचा नेता किंवा प्रमुख म्हणून कार्यरत राहणार आहे. खेडकर यांनी 2005 साली मराठा सेवा संघाचा राजीनामा दिला, परंतु, ते सातत्याने सक्रिय राहिले आहेत. अनेकांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले. खेडेकर यांचे सामाजिक चळवळीतील महत्त्व कायम राहणार आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडचा प्रदेशाध्यक्ष असलंच पाहिजे, असे काही नाही, असं प्रवीण गायकवाड यांनी स्पष्ट केले.
प्र. 1: प्रवीण गायकवाड यांनी शरद पवार यांची भेट का घेतली?
उ: अक्कलकोट येथील हल्ल्यानंतर सुरक्षा आणि सामाजिक अस्थिरतेबाबत चर्चा करण्यासाठी.
प्र. 2: संभाजी ब्रिगेडचे दोन गट एकत्र येण्याची प्रक्रिया का सुरू झाली?
उ: सौरभ खेडकर यांच्या मराठा जोडो अभियानामुळे एकत्र येण्याची हालचाल गतीने सुरू झाली.
प्र. 3: गायकवाड यांचे संभाजी ब्रिगेडमधील भविष्यातील स्थान काय असेल?
उ: ते प्रदेशाध्यक्ष नसलात तरी संघटनेत सक्रिय प्रमुख नेत्याची भूमिका पार पाडतील.
प्र. 4: संभाजी ब्रिगेडचा मुख्य उद्देश काय आहे?
उ: शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार प्रसारित करणारी राजकारण विरहित सामाजिक संघटना बनणे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.