
Pune News : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहेत. त्यामुळे भारतीय निवडणूक आयोगाने ईव्हीएम बाबतच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी काँग्रेसला बैठकीसाठी निमंत्रित केले आहे. काँग्रेसचे एक शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे जाऊन आपलं मत मांडणार आहे. मात्र, त्यापूर्वी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आमच्याकडे ईव्हीएमविरोधात सध्या कोणताही ठोस पुरावा नसल्याचे सांगितले. त्यासोबतच या बैठकीतून काहीच निष्पन्न होणार नाही, असे मत देखील व्यक्त केले.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या गडबडी विरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी उपोषण केले होते. त्यानंतर काँग्रेसचे (Congress) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 'या वयात देखील बाबा आढाव यांनी लोकशाही वाचवण्यासाठी जे आंदोलन केले त्याची नोंद सबंध देशभरात घेतली गेली आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये जो निकाल लागला तो अत्यंत अनपेक्षित होता. मी आत्तापर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या सात निवडणुका लढलो आहे. एखाद्या पक्षाची लाट अथवा हवा असेल तर त्याचा अंदाज राजकीय पक्षाला आणि कार्यकर्त्यांना येतो. मात्र, यावेळेस तसे काही जाणवले नाही. त्यामुळे लागलेला निकाल हा अनपेक्षित असल्याचे मत पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan ) यांनी व्यक्त केले.
पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला 48 पैकी 31 जागा मिळाल्या तर महायुतीला 17 जागांवर समाधान मानावे लागले. या निकालाने महायुतीच्या दहा वर्षाच्या कारभारावर जनतेने नकारात्मक शिक्का मारला असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीचा निकाल फेल असा लागला. त्यानंतर चार साडेचार महिन्याच्या कालावधीमध्ये अशा प्रकारचे बदल होईल, असे राजकीय विश्लेषणामध्ये दिसत नाही.
पाच महिन्यापूर्वी बेरोजगारी भ्रष्टाचार पक्ष फोडाफोडीच्या ज्या राजकारणाला जनतेने नाकारले होते. ते सर्व विसरून जनता पुन्हा एकदा महायुतीला निवडून देईल, अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळे या निकालावर संशय व्यक्त करण्यात येत असून काँग्रेसचे शिष्टमंडळ आता निवडणूक आयोगासोबत बैठकीला जाणार आहे.
निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. मात्र, भाजप सरकार केंद्रामध्ये आल्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाचे आयुक्त बनवण्याचा कायदा बदलला आणि त्यांच्या मर्जीनुसार आयुक्त निवडणूक आयोगाच्या खुर्चीवर बसवण्यात आला आहे. त्यामुळे तेव्हापासूनच आम्हाला या निवडणुका पारदर्शक होतील, याबाबत आम्हाला शंका होती, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार काही पेट्यास तपासण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यातून जास्त काही निष्पन्न होईल असे वाटत नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर विश्वास निर्माण करण्यासाठी सर्व व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मोजणे आवश्यक आहे. मात्र, सरकार यासाठी घाबरत असून फक्त पाच पेट्या मोजू, अशी भूमिका घेत आहे. त्यामुळे संशय आणखीन बळवला जात आहे, असे चव्हाण म्हणाले.
तीन डिसेंबरला निवडणूक आयोगाने काँग्रेससह विरोधी पक्षांना ईव्हीएम विरोधातील तक्रारींबाबत चर्चा करण्यासाठी बोलावले आहे. त्याबाबत बोलताना चव्हाण म्हणाले, निवडणूक आयोगाने चर्चेसाठी बोलावलं असलं तरी ईव्हीएम विरोधात पुरावा मिळणं शक्य नाही. ईव्हीएम मशीन आमच्या हातात दिले, तर तज्ञ तापसतील आणि त्यातून काही समजू शकेल मात्र ती लांबून दाखवली तर आम्हाला कोणताही पुरावा देता येणार नाही. आमच्याकडे प्रत्येक मतदारसंघांमध्ये जे काही झाले आहे. त्याबाबत एम्पिरिकल पुरावा असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
त्यामुळे जोपर्यंत मशीन आमच्याकडे तपासण्यासाठी देत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने बोलावलं असलं तरी त्या बैठकीतून काही साध्य होणार नाही, असे चव्हाण म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.