Pune Ganeshotsav : पुण्याच्या गणेशोत्सवाकडे नेत्यांची पाठ! सुनेत्रा पवार, शिंदे गैरहजर; मोहोळांच्याही मोजक्याच भेटी, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

Pune Ganpati Festival : पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यंदा गणेशोत्सवात काही मोजक्या मंडळांनाच भेटी दिल्या. मात्र, मानाच्या उर्वरित चार गणपतींसह शहरातील अनेक प्रमुख मंडळे आणि कार्यकर्त्यांच्या मंडळांमध्ये मोहोळ यांची उपस्थिती दिसली नाही.
Pune Ganeshotsav
Political leaders’ limited visits to major Ganesh mandals have become a talking point during Pune Ganeshotsav.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 24 Sep : सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पुण्यातील गणेशोत्सवात दरवर्षी राजकीय नेत्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळते. मात्र, यंदाच्या गणेशोत्सवात नेत्यांच्या मोजक्या भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पुण्याच्या पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुण्यात येऊनही मानाच्या गणपतींसह प्रमुख गणेश मंडळांच्या दर्शनाला गेल्या नाहीत.

तर दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुण्यात उपस्थित असूनही गणेश मंडळांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही मोजक्याच मंडळांना भेटी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची चर्चा सुरू झाली आहे.

शिंदे पुण्यातील गणेश मंडळांपासून दूरच

मराठवाड्यातील दुष्काळी दौरा आटोपून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी सायंकाळी पुण्यात येणार होते. विमानतळावरून हेलिकॉप्टरने सिंहगड परिसरातील अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेण्याचे नियोजन असल्याची चर्चा होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत शिंदे पुण्यात पोहोचले नव्हते. सलग दुसऱ्या वर्षी पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवात शिंदे यांची प्रमुख मंडळांमध्ये उपस्थिती दिसली नसल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीची चर्चा रंगली आहे.

मोहोळांच्या भेटीही मोजक्याच

पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यंदा गणेशोत्सवात काही मोजक्या मंडळांनाच भेटी दिल्या. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी मानाचा पहिला कसबा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. त्याचबरोबर भाजप शहराध्यक्षांच्या साने गुरुजी तरुण मंडळालाही भेट दिली. मात्र, मानाच्या उर्वरित चार गणपतींसह शहरातील अनेक प्रमुख मंडळे आणि कार्यकर्त्यांच्या मंडळांमध्ये मोहोळ यांची उपस्थिती दिसली नाही. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी थेट संपर्क साधणाऱ्या नेत्यांच्या यंदाच्या कार्यक्रमाबाबत चर्चा सुरू झाली आहे.

Pune Ganeshotsav
Pune DCC Bank Election : आमदाराची पत्नी विरुद्ध माजी आमदार? पुणे जिल्हा बँकेच्या आखाड्यात पुन्हा ‘कुल-थोरात’ आमनेसामने

सुनेत्रा पवार पुण्यात, तरी गणेश मंडळांपासून अंतर

पुण्याच्या पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात आल्या होत्या. पुणे फेस्टिव्हलच्या कार्यक्रमालाही त्यांनी उपस्थिती लावली. मात्र, मानाच्या गणपतींसह प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देण्यासाठी त्या गेल्या नसल्याचे चित्र आहे. पुण्यातील गणेशोत्सवाला देशभरातून तसेच परदेशातून गणेशभक्त येतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात राजकीय नेत्यांची पुण्यातील उपस्थिती आणि प्रमुख मंडळांना दिल्या जाणाऱ्या भेटींनाही राजकीय महत्त्व असते. यंदा मात्र प्रमुख नेत्यांच्या मोजक्या भेटींमुळे या परंपरेत बदल झाल्याचे दिसत आहे.

अजितदादांच्या देखाव्यांना भेटीची कार्यकर्त्यांना अपेक्षा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरचा हा पहिलाच गणेशोत्सव असल्याने शहरातील अनेक गणेश मंडळांनी त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित देखावे साकारले आहेत. त्यामुळे हे देखावे पाहण्यासाठी सुनेत्रा पवार किंवा खासदार पार्थ पवार यांनी मंडळांना भेट द्यावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत होती. अजित पवार हे गणेशोत्सवाच्या काळात मानाच्या गणपतींसह शहरातील प्रमुख आणि कार्यकर्त्यांच्या गणेश मंडळांना आवर्जून भेट देत असत.

Pune Ganeshotsav
Raj Thackeray : 'सभेला गर्दी होते मग मतं कुठे जातात?' विचारणाऱ्यांना राज ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "आयोगाकडून 'मॅच फिक्सिंग' पुराव्याने सिद्ध...'

त्यामुळे यंदा त्यांच्या अनुपस्थितीत निर्माण झालेली पोकळी अधिक प्रकर्षाने जाणवत असल्याची चर्चा गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. विशेष म्हणजे मुंबईतील लालबागच्या गणपतीचे दर्शन घेणाऱ्या सुनेत्रा पवार पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांच्या दर्शनासाठी गेल्या नाहीत. त्यामुळे पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येही याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

सुप्रिया सुळेंच्या गणेश मंडळांना भेटी

एकीकडे सत्ताधारी गटातील प्रमुख नेत्यांच्या मोजक्या भेटी होत असताना खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी गणेशोत्सवाच्या पहिल्याच आठवड्यात पुण्यातील मानाच्या गणपतींसह प्रमुख गणेश मंडळांना भेटी दिल्या. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या गणेशोत्सवातील उपस्थितीची तुलना आता राजकीय वर्तुळात केली जात आहे.

पुण्याचा गणेशोत्सव हा केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव न राहता राजकीय नेत्यांसाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचे आणि शहरातील विविध भागांमध्ये संपर्क वाढवण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ मानले जाते. अशा परिस्थितीत यंदा काही प्रमुख नेत्यांनी गणेश मंडळांपासून ठेवलेले अंतर चर्चेचा विषय ठरले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com