

Pune News : घोले रोड येथील पुणे महापालिकेच्या महापौर निवासाच्या नामकरणावरून पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. स्वीकृत नगरसेवक रवींद्र साळेगावकर यांनी महापौर निवासाचे नाव बदलून ‘रामदूत’ करण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर त्याला विरोध सुरू झाला आहे. पूर्व महापौर संघटनेसह शिवसेना ठाकरे गटाने या प्रस्तावाला विरोध केला असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या वास्तूला ‘शिवनेरी’ असे नाव देण्याची मागणी केली आहे.
महापौर निवासाचे नाव बदलू नये, अशी भूमिका पुणे शहर पूर्व महापौर संघटनेने घेतली आहे. संघटनेच्या अध्यक्षा राजलक्ष्मी भोसले, सचिव कमल व्यवहारे, संयोजक अंकुश काकडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला विरोध करत संबंधित नगरसेवकाला प्रस्ताव मागे घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी महापौरांकडे केली आहे.
पुणे महापालिकेने महापौरांना शहराच्या मध्यवर्ती भागात अधिकृत निवासाची सुविधा मिळावी, या उद्देशाने घोले रोड येथे दोन मजली बंगला उभारला होता. २००२ मध्ये तत्कालीन महापौर दीप्ती चवधरी यांच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन झाले. तेव्हापासून ही वास्तू ‘महापौर निवास’ या नावाने ओळखली जाते. त्यामुळे ऐतिहासिक ओळख असलेल्या या वास्तूचे नामकरण बदलण्यास पूर्व महापौर संघटनेने आक्षेप घेतला आहे.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटानेही ‘रामदूत’ नामकरणाला विरोध केला आहे. पुणे शहर प्रचारप्रमुख अनंत घरत यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देत सार्वजनिक आणि संवैधानिक वास्तूला धार्मिक स्वरूप देणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.
महापौर निवास ही कोणत्याही व्यक्ती, पक्ष अथवा धर्माची मालमत्ता नसून पुणेकरांच्या करातून उभारलेली सार्वजनिक वास्तू आहे. त्यामुळे या वास्तूची धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक ओळख कायम ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उडी घेतली आहे. माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि पक्षाचे पुण्यातील नेते विशाल तांबे यांनी महापौरांकडे पत्र देत महापौर निवासाला ‘शिवनेरी’ असे नाव देण्याची मागणी केली आहे.
पुण्याची ऐतिहासिक ओळख, महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान आणि मराठी स्वराज्याच्या वैभवाचा विचार करता ‘शिवनेरी’ हे नाव अधिक समर्पक ठरेल, अशी भूमिका तांबे यांनी पत्रातून मांडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेला शिवनेरी किल्ला हा केवळ ऐतिहासिक वास्तू नसून शौर्य, स्वाभिमान, दूरदृष्टी, न्यायप्रियता आणि जनकल्याणकारी राज्यकारभाराचे प्रेरणास्थान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पुणे शहराची ऐतिहासिक ओळख छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, राजमाता जिजाऊ साहेबांचे संस्कार आणि स्वराज्याच्या इतिहासाशी जोडलेली आहे. त्यामुळे महापौरांच्या अधिकृत निवासस्थानाला ‘शिवनेरी’ हे नाव दिल्यास पुण्याच्या ऐतिहासिक वारशाला आणि छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेला योग्य सन्मान मिळेल, अशी भूमिका तांबे यांनी मांडली आहे.
विशेष म्हणजे, ‘रामदूत’ नामकरणाच्या प्रस्तावाला विरोध करणाऱ्या राजकीय आणि माजी महापौरांच्या संघटनांच्या भूमिकेनंतर आता राष्ट्रवादीने थेट ‘शिवनेरी’चा पर्याय पुढे केला आहे. त्यामुळे या वादाच्या पार्श्वभूमीवरती नेमकं नामांतर होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.