

Pune News : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी 23 ऑक्टोबरला उत्साही वातावरणात मतदान पार पडले. त्यामुळे 27 ऑक्टोबरला सकाळी आठ वाजल्यापासून होत असलेल्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. या निवडणुकीच्या रिंगणात 30 उमेदवार मैदानात उतरले असल्याने मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन होणार आहे. त्यातच या शिक्षक मतदारसंघात इतिहासाची पुनरावृतीहोण्याची शक्यता काही राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
या मतदारसंघात 2014 आणि 2020 च्या निवडणुकांमध्ये पहिल्या पसंतीच्या मतांवर विजयाचा कोटा पूर्ण झाला नव्हता. त्यामुळे दोन्ही वेळा दुसऱ्या पसंतीक्रमानुसार झालेली मतमोजणीच निर्णायक ठरली. 2020 च्या निवडणुकीमध्ये विजयासाठीचा कोटा पूर्ण करण्यासाठी काँग्रेसच्या जयंत आसगावकर यांना 34 व्या फेरीची वाट पाहावी लागली होती. त्यामुळे यावेळेस देखील होत असलेल्या चुरशीच्या मतदानामुळे पहिल्या पसंतीमध्ये विजयी उमेदवार ठरणार नाही तर दुसऱ्या पसंतीच्या मतांवरच आमदार ठरण्याची शक्यता आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील शिक्षकांचा समावेश आहे. या मतदारसंघात विजयाची जुळवाजुळव करीत असताना शिक्षक मतदान, शिक्षण संस्थांचे पाठबळ आणि शिक्षक संघटनांची ताकद या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. भाजपचे (BJP) कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर, अपक्ष दत्तात्रय सावंत आणि शिवसेना पुरस्कृत सचिन सानप यांच्यासह एकूण 30 उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे उमेदवाराची शिक्षकांच्या प्रश्नांवरील भूमिका आणि जिल्हानिहाय मतदान विजयाचे अंतर ठरवणार आहे. मात्र, या निवडणुकीत केवळ पहिल्या पसंतीची आघाडी पुरेशी ठरणार नसून, या निवडणुकीचा अंतिम निकाल येण्यासाठी 'दुसऱ्या पसंतीच्या' मतांवरच अवलंबून राहावे लागणार आहे.
इतिहासाची पुनरावृत्ती होणार का ?
२०१४ आणि २०२० च्या निवडणुकांमध्ये पहिल्या पसंतीच्या मतांवर विजयाचा कोटा पूर्ण झाला नव्हता. त्यामुळे दोन्ही वेळा पसंतीक्रमानुसार झालेली मतमोजणीच निर्णायक ठरली. आतापर्यंतचा निवडणूक निकाल पहिला तर २००२ मध्ये गजेंद्र ऐनापुरे विजयी झाले होते. २००८ मध्ये भगवानराव साळुंखे विजयी झाले तर २०१४ साली दत्तात्रय सावंत दुसऱ्या पसंतीक्रमाने विजयी झाले होते तर २०२० साली दुसऱ्या पसंतीक्रमाने जयंत आसगावकर विजयी झाले होते. त्यामुळे दुसऱ्या पसंतीक्रमाने विजयी होण्याची ही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का ? याची उत्सुकता लागली आहे.
२०२० च्या मतमोजणीवेळी नेमके काय झाले?
२०२० च्या निवडणुकीत विजयासाठी २५ हजार ११४ मतांचा कोटा आवश्यक होता. पहिल्या पसंतीक्रमात काँग्रेसच्या (Congress) जयंत आसगावकर यांना १६ हजार ८७४ मते मिळाली, पण कोटा पूर्ण झाला नाही. कमी मते मिळालेल्या उमेदवारांना एकापाठोपाठ एक बाद करत त्यांच्या मतपत्रिकांवरील दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात आली. तब्बल ३३ फेऱ्यांनंतरही कोणाचाच कोटा पूर्ण झाला नव्हता. अखेर ३४ व्या फेरीत तत्कालीन आमदार दत्तात्रय सावंत बाद झाल्यानंतर त्यांच्या मतपत्रिकांवरील दुसऱ्या पसंतीची मते जयंत आसगावकर यांच्याकडे वळाली. यामुळे आसगावकर यांनी २५ हजार ९८५ मते मिळवून विजय मिळवला, तर सावंत १५ हजार ३५७ मतांवर रोखले गेले.
या निवडणुकीत काय असणार हे चित्र
पुणे शिक्षक मतदारसंघात २०२६ साली ६१ हजार ९४० मतदारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५३ हजार १८४ जणांचे मतदान झाले आहे. जर सर्व ५३ हजार १८४ मते वैध ठरली, तर विजयासाठीचा पहिल्या पसंतीचा कोटा साधारणपणे २६ हजार ५९३ मते असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत पहिल्या पसंतीत कोण आघाडी घेतो, किती मते अवैध (बाद) ठरतात आणि आवश्यक कोटा पूर्ण न झाल्यास बाद झालेल्या उमेदवारांची दुसऱ्या पसंतीची मते कोणाकडे वळतात, यावरच नव्याने निवडून येणाऱ्या आमदाराचे नाव निश्चित होईल. कौस्तुभ गावडे, जयंत आसगावकर, दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप या प्रमुख उमेदवारांपैकी इतरांच्या मतदारांचा 'दुसरा पसंतीक्रम' कोणाला मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.