Pune News : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीने (टीडीएफ) अखेर आपला उमेदवार जाहीर केला आहे. २३ ऑगस्ट रोजी झालेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीनंतर संस्थाचालक कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या नावावर टीडीएफच्या निवड समितीने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे टीडीएफकडे उमेदवारीसाठी मुलाखत दिलेले सचिन सानप यांना उमेदवारी मिळाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सचिन सानप हे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे OSD म्हणून कार्यरत असल्याने त्यांनी शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी टीडीएफकडे मुलाखत दिल्याची बाब चर्चेचा विषय ठरली होती. मात्र, टीडीएफने अखेर कौस्तुभ गावडे यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केल्याने सानप यांच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
टीडीएफच्या वतीने पुणे विभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. यामध्ये पुण्यासह सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांतील इच्छुक सहभागी झाले होते. या मुलाखतीनंतर निवड समितीने कौस्तुभ गावडे यांच्या नावाची घोषणा केली.
संघटनेशी असलेली बांधिलकी, शिक्षकांच्या प्रश्नांची जाण, शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव आणि प्रभावी प्रतिनिधित्वाची क्षमता या निकषांच्या आधारे गावडे यांची निवड करण्यात आल्याचे टीडीएफने स्पष्ट केले.
इच्छुकांच्या मुलाखतीपूर्वीच टीडीएफने ‘उमेदवार हा मूळ शिक्षकच असला पाहिजे’ अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे मंत्री उदय सामंत यांचे OSD असलेल्या सचिन सानप यांच्या मुलाखतीनंतर त्यांच्या उमेदवारीची मोठी चर्चा झाली होती.
सानप हे शिक्षक असल्याने टीडीएफच्या या निकषात ते बसत असतानाही अखेर त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्याऐवजी शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असलेल्या कौस्तुभ गावडे यांच्यावर संघटनेने विश्वास दाखविला आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कौस्तुभ गावडे यांनी टीडीएफची पुणे विभागात मजबूत संघटनात्मक पार्श्वभूमी असल्याचा दावा केला. तसेच टीडीएफच्या मतदार नोंदणी अभियानातून ४० हजारांहून अधिक शिक्षक मतदारांची नोंदणी झाल्याचे त्यांनी सांगितले.
टीडीएफचा पाठिंबा आणि संघटनेचे नेटवर्क यामुळे आगामी निवडणुकीत आपल्याला संघटनात्मक बळ मिळेल, असा विश्वासही गावडे यांनी व्यक्त केला. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न प्रभावीपणे विधान परिषदेत मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात राजकीय पक्षांकडूनही उमेदवार देण्याची तयारी सुरू असताना टीडीएफने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिल्याने निवडणुकीतील चित्र अधिक स्पष्ट झाले आहे. एकीकडे राजकीय पक्षांचे संभाव्य उमेदवार, तर दुसरीकडे शिक्षक संघटनांच्या माध्यमातून मैदानात उतरलेला टीडीएफचा उमेदवार अशी लढत रंगण्याची शक्यता आहे.
टीडीएफचे माजी अध्यक्ष कानडे सर यांनी कौस्तुभ गावडे यांची उमेदवारी ही टीडीएफची अधिकृत उमेदवारी नसल्याचे स्पष्ट करत संघटनेच्या निर्णयावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
टीडीएफच्या जिल्हा आणि तालुका प्रतिनिधींचा मूळ शिक्षकालाच उमेदवारी देण्याबाबत तीव्र आग्रह होता. मात्र, अध्यक्ष जी. के. थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इतर प्रतिनिधींवर दबाव आणून हा निर्णय लादल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.