

Pune News : पुणे जिल्हा परिषदेच्या विविध चार विषय समित्यांच्या सभापतीपदी मावळ, वेल्हे, इंदापूर आणि हवेली या तालुक्यातील अनुक्रमे दीपाली हुलावळे, अमोल नलावडे, अंकिता पाटील आणि जितेंद्र बढेकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. यानुसार दीपाली हुलावळे आणि अमोल नलावडे या दोघांपैकी एकाची बांधकाम व आरोग्य समिती सभापतीपदी तर दुसऱ्यांची कृषी व पशुसंवर्धन समिती सभापतीपदी निवड जाहीर केली जाणार आहे.
महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी इंदापूर तालुक्यातील अंकिता पाटील यांची तर, समाजकल्याण समिती सभापतीपदी हवेली तालुक्यातील जितेंद्र बढेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडीमुळे खेड, जुन्नर, शिरूर आणि बारामती या तालुक्यांचा यावेळी पत्ता कट झाला आहे.
पुणे जिल्हा परिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सदस्यांची बैठक गुरुवारी (2 एप्रिल) सकाळी 10.30 वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या बंगल्यावर सुरू झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सूनेत्रा पवार यांनी सभापती पदांसाठी पाठवलेले बंद पाकिट उघडण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद गटनेते श्रीमंत ढोले आणि सर्व सदस्य उपस्थित होते. सभापती पदांसाठीची समितीनिहाय नावे जाहीर झाल्यानंतर पक्षाच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी एकमताने या नावांवर शिक्कामोर्तब केले.
दरम्यान, सभापती पदासाठी उमेदवारी जाहीर झालेल्या चारही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अध्यक्षांच्या बंगल्यावरच भरण्यात आले आणि तेथूनच ते जिल्हा परिषदेत पीठासन अधिकारी यशवंत माने यांच्याकडे दाखल करण्यात आले. जिल्हा परिषदेचे नवे सभापती अनुक्रमे अमोल नलावडे (वेल्हे तालुक्यातील विंझर गट), दीपाली हुलावळे (मावळ तालुक्यातील खडकाळे), अंकिता पाटील (इंदापूर तालुक्यातील बावडा) आणि जितेंद्र बढेकर (हवेली तालुक्यातील ऊरळीकांचन गट) असे आहेत.
भोरचे विक्रम खुटवड यांनी सभापतीपद नाकारले
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी सुरुवातीला भोर तालुक्यातील विक्रम खुटवड यांना सभापती पदाची संधी दिली होती. त्यांचे नावही अधिकृतपणे जाहीर करण्यात आले होते. मात्र खुटवड यांनी “मला सभापती पद नको” असे म्हणत ही संधी नाकारली. त्यानंतर ऐनवेळी त्यांच्याऐवजी वेल्हे तालुक्यातील अमोल नलावडे यांना ही संधी देण्यात आली.
खुटवड यांना हवे मोठे पद
खुटवड यांना कृषीचे सभापतीपद देण्यात येणार होते. मात्र त्यांना मोठे पद हवं असल्याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. तसेच अडीच वर्षानंतर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पद बदलण्यात येणार आहे. खुटवड हे अध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे त्यावेळी देखील आपला पत्ता कट होऊ नये या दृष्टीकोनातून त्यांनी हे पद नाकारले असल्याचे देखील बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.