

Pune News : खोट्या आरोपांचा ससेमिरा मागे लावण्यात आलेला असताना, तब्बल दोन वर्षांच्या अखंडित खडतर लढाईनंतर निर्दोष ठरलेल्या दत्तात्रय वारे गुरुजी यांना थेट 'शिवतीर्था'वर येण्याची विचारणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या कार्यालयातून करण्यात आली. येत्या दोन-चार दिवसांत वारे आणि वाबळेवाडीच्या ग्रामस्थांचा मनसेकडून सत्कार होणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. (Latest Marathi News)
काचेची शाळा, क्रमिक अभ्यासक्रमाशिवाय इतर १६ वेगवेगळ्या विषयांचे अध्यापन आणि थेट स्वीडनच्या गोटलँड व एम.जी. स्कूल या दोन शाळांशी सामंजस्य करार करून आंतराष्ट्रीय शाळा अशी दर्जा मिळविलेल्या वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक तथा वाबळेवाडी पॅटर्नचे जनक दत्तात्रय वारे यांना राज ठाकरे यांनी निमंत्रित केले आहे.
राज ठाकरे यांना वारे यांच्या निर्दोषत्वाच्या निकालाची माहिती मिळाल्याचे सांगत गुरुजींना शिवतीर्थावर कधी यायला जमेल? अशी विचारणा मनसेकडून करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. 'गुरुजी तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत असल्याची ग्वाही राज ठाकरे यांनी तीन आठवड्यांपूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात वारे यांना दिली होती. याच वेळी ठाकरे यांनी वारेंना निवासस्थानी येण्याचे निमंत्रण दिले होते.
मात्र, काल (ता. २३) वारेंच्या संदर्भात आलेल्या निकालाचे वृत्त राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहाेचताच आज सकाळी दहाच्या सुमारास वारे यांना मुंबई मनसे कार्यालयातून फोन आला होता. त्यात मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले असून, पुढील चार दिवसांत तारीख निश्चित करीत असल्याचेही त्यांना सांगण्यात आले.
गेल्या दोन वर्षांच्या लढाईत आमदार सुरेश धस यांनी थेट वाबळेवाडीत येऊन ग्रामस्थांच्या लढाईत सोबत असल्याचे सांगितले होते व विधान परिषद सभागृहातही वाबळेवाडीकरांची बाजू लावून धरली होती. याच पार्श्वभूमीवर धस यांनी आज सकाळीच फोन करून वारेंसह संपूर्ण वाबळेवाडीकरांचे कौतुक केले व अभिनंदनही केले. दरम्यान, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही निकालाची माहिती मिळताच केंदूर (ता.शिरूर, जि. पुणे) येथे वारे यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.