
Pune News, 31 Jan : पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या रवींद्र धंगेकरांचा लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मुरलीधर मोहोळांनी तर विधानसभेला हेमंत रासने यांनी पराभव केला. काँग्रेसने विधानसभा निवडणुकीचं तिकीट धंगेकरांना दिल्यामुळे पुणे काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला होता.
अनेकांनी विधानसभेचं तिकीट देण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पुण्यातील काँग्रेस नेत्यांना धंगेकर (Ravindra Dhangekar) नकोत याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे कसब्यातील पराभवानंतर आता रवींद्र धंगेकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच त्यांनी गुरूवारी (ता.30) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना (Shivsena) (शिंदे गट) प्रमुख एकनाथ शिंदें यांना भेटल्यामुळे धंगेकर काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार यावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात होतं.
मात्र, आता खुद्द धंगेकरांनी या सर्व चर्चा फेटाळून लावत आपण काँग्रेस (Congress) सोडून कुठेही जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. माध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर यांनी आपण एकनाथ शिंदेंना का भेटलो याबाबतची माहिती सांगितली. ते म्हणाले, मी काल माझ्या कामासाठी एकनाथ शिंदेंना भेटलो. माझ्या वैयक्तिक कामानिमित्त मी त्यांना भेटलो. यावेळी त्यांच्या पक्षात जाण्याबाबतची काहीही चर्चा नाही झाली.
तर यावेळी तुम्ही शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याची चर्चा सुरू असल्याचं विचारताच ते म्हणाले, ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, माझा थोडा प्रॉब्लेम होता, त्यानिमित्त मी त्यांना भेटलो. मला वाटलं तर मी अजितदादांना देखील भेटू शकतो. माझे त्यांच्याशी पूर्वीचे संबंध आहेत. मात्र, मी काँग्रेसमध्येच राहणार आहे शिवसेनेत प्रवेश करणार नाही, असं धंगेकरांनी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.