Pune News, 04 Jul : आपल्या नावावरून 'अर्ध-पाकिस्तानी' असा उल्लेख करत जाहीर अपमान केल्या प्रकरणी, ठाकरेचे वकील अॅड. असीम सरोदे यांनी शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे. आमदार गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या बेजबाबदार विधानांचा निषेध करत सरोदे यांनी त्यांच्याकडे जाहीर माफीची मागणी केली आहे.
आमदार संजय गायकवाड यांनी १० जून रोजी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये अॅड. असीम सरोदे यांच्यावर टीका करताना, "हा अर्ध पाकिस्तानी, अर्ध हिंदुस्तानी कोण आहे? या वकीलाच्या बुद्धीची मला कीव येते," अशा स्वरूपाचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सरोदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
अॅड. असीम सरोदे हे प्रॅक्टिसिंग अॅडव्होकेट असून, सोशिओ-लीगल-कॉन्स्टिट्यूशनल अॅनालिस्ट (सामाजिक-कायदेशीर-घटनात्मक विश्लेषक) आहेत. कायदेशीर क्षेत्रात आणि समाजात त्यांची मोठी प्रतिष्ठा आहे. असे असताना एखाद्या व्यक्तीचे नाव मुस्लिमसदृश्य आहे म्हणून त्याला 'पाकिस्तानी' म्हणणे अत्यंत अपमानास्पद, पूर्वग्रहदूषित आणि बदनामीकारक आहे.
नागरिकत्वावर शंका उपस्थित करणे चुकीचे: एखाद्या नागरिकाच्या राष्ट्रीयत्वाबाबत आणि नागरिकत्वाबाबत अशी बेजबाबदार टिप्पणी करणे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे असल्याचे नोटीसीमध्ये नमूद करण्यात आले आहे. याबाबत बोलताना असीम सरोदे म्हणाले, "बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे सातत्याने बेताल विधानं करत आलेले आहेत. आणि माझ्या संदर्भात सुद्धा त्यांनी नुकतंच जाहीर वक्तव्य एका पत्रकार परिषदेमध्ये केलं, जे अपमानजनक आणि अब्रू नुकसान करणारं आहे.
माझं नाव असीम सरोदे असं असल्यामुळे त्यांनी असं म्हटलं की, 'हा अर्ध पाकिस्तानी, अर्ध हिंदुस्तानी कोण आहे? या वकीलाच्या बुद्धीची मला कीव येते.' अशा स्वरूपाचे वक्तव्य त्यांनी केले. मुळात एखाद्या व्यक्तीला मुस्लिम सदृश्य नाव असल्यामुळे काहीतरी टोचून बोलणं, त्याच्या राष्ट्रीयत्वाचा अपमान करणं, नागरिकत्व शंकास्पद आहे अशा स्वरूपाचं विधान करणं, हा माझा अपमान आहे असं माझं स्पष्ट मत आहे.
दुसरं, कोणी मुस्लिम आहे, भारतीय आहे म्हणून त्याला काहीही म्हणण्याचे अधिकार जणू काही आपल्याला आहेत, हा धर्मांध विचार जो संजय गायकवाड आणि त्यांच्यासारख्या प्रवृत्ती करतात, तो अत्यंत चुकीचा आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देऊन त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केलेली आहे. त्यांनी जर जाहीर माफी मागितली नाही, तर अर्थातच न्यायालयात जाण्याचा माझा मार्ग मोकळा आहे.
परंतु मला असं वाटते की, माझी लढाई, माझा राग किंवा मला वाईट वाटलेलं आहे ते संजय गायकवाड या व्यक्तीबद्दल नाही, तर त्यांच्या प्रवृत्तीबद्दल मला नक्कीच वाईट वाटलेलं आहे. अशा व्यक्ती बेजबाबदार विधानं करणारी अशी माणसं आमदार असतात, लोकप्रतिनिधी असतात आणि जणू आपल्याला कोणीच काही करू शकत नाही असं त्यांना वाटते. संजय गायकवाड सारख्या प्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी नागरिकांनी पुढे आलं पाहिजे, असं मला नक्की वाटतं." असं असीम सरोदे म्हणाले.