Voter ID Scam : "व्हॉट्सॲपवर 5 रुपयांची लिंक अन्" मतदार कार्ड अपडेटच्या नावाखाली नागरिकांची 16 लाखांचा गंडा; नवा सायबर फ्रॉड समोर

Voter ID card update scam in India : मतदार कार्ड अपडेटच्या नावाखाली व्हॉट्सॲपवर 5 रुपयांचा मेसेज पाठवून 16 लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. जाणून घ्या नव्या सायबर फ्रॉडची माहिती आणि बँक खाते सुरक्षित ठेवण्याचे उपाय.
WhatsApp 5 rupee message cyber fraud
WhatsApp 5 rupee message cyber fraudSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : मतदार ओळखपत्र अपडेट करण्याच्या नावाखाली सायबर भामट्यांनी पुण्यातील दोन ज्येष्ठ नागरिकांना तब्बल १६ लाख ९२ हजार २२ रुपयांचा गंडा घातला आहे. निवडणूक आयोगाचा अधिकारी असल्याचे भासवून व्हॉट्सॲपवर संपर्क साधायचा, अवघ्या पाच रुपयांचे शुल्क भरण्यास सांगायचे आणि त्यानंतर बँक खात्यांतील लाखो रुपये परस्पर हस्तांतरित करायचे, असा फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. येरवडा आणि स्वारगेट परिसरात घडलेल्या या घटनांमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या ऑनलाइन आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

विशेष म्हणजे, दोन्ही प्रकरणांत मतदार ओळखपत्राच्या प्रक्रियेचा आधार घेऊन नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला. एका प्रकरणात पती-पत्नीच्या बँक खात्यांतून पाच लाख रुपये, तर दुसऱ्या प्रकरणात एका ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून ११ लाख ९२ हजार २२ रुपये काढण्यात आले.

WhatsApp 5 rupee message cyber fraud
School Roof Collapse : शाळेचे छत कोसळून 29 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू; 40 जखमी, पाकिस्तानमधील थरकाप उडवणारी घटना!

आधी विश्वास संपादन, नंतर खात्यावर डल्ला!

येरवडा येथील ब्लू हिल सोसायटीत राहणारे कांजाशेरी वैद्यनाथन व्यंकटेशन (वय ८०) हे टाटा मोटर्समधून सेवानिवृत्त झाले आहेत. सात ऑक्टोबर रोजी एका अनोळखी व्यक्तीने त्यांना फोन करून आपण निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून राजीव चंद्रशेखर बोलत असल्याचे सांगितले. मतदार ओळखपत्र अपडेट करणे आवश्यक असल्याचे सांगत त्याने व्हॉट्सॲपवर लिंक पाठवली. या प्रक्रियेसाठी पाच रुपये शुल्क भरण्यासही सांगितले.

मात्र, शुल्क भरण्याचा व्यवहार पूर्ण झाला नसल्याचे सांगून संबंधित व्यक्तीने फोन बंद केला. त्यानंतर व्यंकटेशन आणि त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यांतून प्रत्येकी अडीच लाख रुपये, असे एकूण पाच लाख रुपये परस्पर हस्तांतरित करण्यात आले.

नावातील दुरुस्तीच्या बहाण्याने १२ लाख लंपास

स्वारगेट परिसरातील आदिनाथ सोसायटीत राहणारे गिरीश राठीलाला शहा (वय ७९) यांनी त्यांच्या व्यावसायिक भागीदाराच्या मतदार ओळखपत्रावरील नावात दुरुस्ती करण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. त्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याशी व्हॉट्सॲपवर संपर्क साधून प्रक्रियेसाठी पाच रुपये शुल्क भरण्यास सांगितले.

शहा यांनी यूपीआयद्वारे शुल्क भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्यवहार अयशस्वी झाल्याचा संदेश आला. काही वेळाने बँक खात्यातील शिल्लक तपासली असता पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यातून दोन स्वतंत्र व्यवहारांद्वारे चार लाख ९९ हजार ११ रुपये आणि सहा लाख ९३ हजार ११ रुपये, अशी एकूण ११ लाख ९२ हजार २२ रुपयांची रक्कम एनईएफटीद्वारे अन्य खात्यांत हस्तांतरित झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

WhatsApp 5 rupee message cyber fraud
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! 5 केंद्रीय योजनांची नावे बदलली; पाहा संपूर्ण यादी

अनोळखी लिंकपासून सावध राहा!

मतदार ओळखपत्र अपडेट करण्याच्या नावाखाली होणाऱ्या या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनोळखी व्यक्तींनी पाठविलेल्या लिंकवर क्लिक करणे टाळावे. व्हॉट्सॲपवरून आलेल्या एपीके फाइल डाउनलोड करू नयेत. निवडणूक आयोगाच्या नावाने फोन आल्यास अधिकृत माध्यमांतून माहितीची खातरजमा करावी. बँक खात्यातून अनधिकृत व्यवहार झाल्याचे लक्षात येताच तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइनवर संपर्क साधावा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com