Pune, 26 March : तब्बल 20 वर्षांनंतर मी स्वगृही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो आहे. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते, अतुल बेनके यांच्या खांद्याला खांदा लावून शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ताकद देण्यासाठी काम करेन, अशी ग्वाही माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशानंतर दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या सभेत आढळराव पाटील यांनी एकत्र काम करण्याची ग्वाही दिली. ते म्हणाले, मला बोलबच्चनगिरी, लबाडी व खोटा प्रचार करायला जमत नाही. लोकसभेतील पंधरा वर्षांची कामगिरी व मतदार संघातील जनसंपर्क जनतेने जवळून बघितला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
माझ्यामध्ये आणि आमदार दिलीप मोहितेंमध्ये (Dilip Mohite) कोणत्याही स्वरूपाचे वैयक्तिक मतभेद नाहीत. आमदार मोहिते चांगले राजकारणी आहेत. माझी राजकीय पार्श्वभूमी नाही, त्यामुळे मी तसा हाडाचा राजकारणी नाही. माझ्या राजकीय कारकिर्दीला भीमाशंकर कारखान्यापासून सुरुवात झाली होती. पुढच्या काळात थोडे मतभेद झाले आणि मी शिवसेनेत गेलो. मी तीनवेळा लोकसभेला निवडून गेलो, असा आपला इतिहास आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी सांगितला.
मागील 2019 च्या निवडणुकीत झालेल्या पराभवाने मी खचून गेलो नाही. दुसऱ्या दिवसापासून मी कामाला सुरुवात केली होती. तेव्हापासून पायाला भिंगरी लावून मतदारसंघात फिरत आहे. मला गेल्या 15 वर्षांत जेवढा निधी मिळाली, तेवढा निधी मला महायुती सरकारच्या काळात मिळाला आहे. शिरूरमधून उमेदवारीसाठी अजितदादांसमोर (Ajit Pawar) अनेक प्रस्ताव होते. मात्र, त्यांनी माझ्या नावाला पसंती दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका करताना आढळराव म्हणाले, मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व शपथविधी वेळी दोन दिवस पुन्हा अजितदादा यांच्यासमवेत त्यानंतर शरद पवार यांच्या पक्षात, असा कोल्हे यांचा प्रवास राहिलेला आहे, त्यामुळे कोण बेडूक उड्या मारत आहे, हे जनतेला माहित आहे. पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग ही काम होण्यासाठी अजित पवार यांनी प्रयत्न केले. तसेच मीही यापूर्वी या कामाचा पाठपुरावा केला आहे. पण बायपासचे नारळ फोडायला कोल्हे गेले.
मलाही दोनवेळा संसदरत्न पुरस्कार मिळालाय...
संसदरत्न पुरस्कार मलाही दोनवेळा मिळालेला आहे. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या वेळीही माझी निवड करण्यात आली होती. मात्र, त्यास नकार दिला. चेन्नई येथे आठ बाय दहाच्या खोलीत असलेली एक संस्था हे पुरस्कार देते. पण काहीजणाकडून संसद रत्न पुरस्कार नुसती जाहिरात सुरू आहे, असा टोलाही शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांना लगावला.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.