
Maharashtra Political News : महायुती सरकारचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी मोठ्या शक्तिप्रदर्शनात मुंबईत पार पडला. भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि ते (स्व.) वसंतराव नाईक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नाईक, पवार यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. फडणवीसांचा २०१९ चा कालावधी छोटा असला तरी मुख्यमंत्री म्हणून त्यांची नोंद झाली आहे.
विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले. निकालानंतर बाराव्या दिवशी राज्यात नवे सरकार अस्तित्वात आले आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच ते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Vasantrao Naik) आणि शरद पवार यांच्या पंक्तीत बसले आहेत. फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. यापूर्वी ही कामगिरी केवळ वसंतराव नाईक आणि शरद पवार यांनाच करता आली आहे. या दोघांनंतर फडणवीस यांनी ती किमया साधली आहे.
फडणवीस यांनी 31 आक्टोबर 2014 पासून 12 नोव्हेंबर 2019 पर्यंत सलग पाच वर्षे 12 दिवस मुख्यमंत्री म्हणून काम केले. त्यानंतर 2019 मध्ये फडणवीस हे अजित पवार यांच्या मदतीने पाच दिवस मुख्यमंत्री बनले होते. फडणवीस यांनी 23 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2019 असे पाच दिवस मुख्यमंत्री म्हणून काम केले होते. मात्र, अजित पवार यांना माघार घ्यावी लागल्याने फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) हे चार वेळा मुख्यमंत्री बनले होते. त्यांनी 18 जुलै 1978 ते 17 फेब्रुवारी 1980 या दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केले होते. सर्वांत तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान पवारांना मिळाला होता. त्यानंतर 26 जून 1988 ते 4 मार्च 1990, तसेच 4 मार्च 1990 ते 25 जून 1991 या कालावधीत मुख्यमंत्री होते. त्यानंतर 6 मार्च 1993 ते 14 मार्च 1995 दरम्यानही त्यांनी मुख्यमंत्रिपद भूषविले आहे.
शरद पवार यांच्या अगोदर वसंतराव नाईक हे सलग तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. नाईक हे 5 डिसेंबर 1963 रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते. ते 1 मार्च 1967 पर्यंत मुख्यमंत्रिपदावर होते. त्यानंतर 1 मार्च 1967 ते 13 मार्च 1972 आणि 13 मार्च 1972 ते 21 फेब्रुवारी 1975 या कालावधीत वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री होते. नाईक हे सलग 11 वर्षे 78 दिवस मुख्यमंत्री होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.