
Pune News : गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, बच्चू कडू अशा अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. तर विश्वजित कदम, जयंत पाटील, आदित्य ठाकरे नेते हे अगदी काठावर निवडून आले. विधानसभा निवडणुकीआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागला होता. अवघ्या 6 महिन्यात लागलेला हा निकाल महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांसाठी धक्कादायक होता.
तेव्हापासूनच महाराष्ट्रात मतदान, मतदार याद्या यामध्ये घोळ झाल्याचे आरोप होऊ लागले. आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपासून मतचोरीचा मुद्दा हाती घेतला आहे. अशात तिवसा विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या मतदारसंघात मतदार यादीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. 'सरकारनामाला' दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी गेल्या चार निवडणुकांची आकडेवारीसहीत हा घोटाळा मांडला आहे.
काय म्हणाल्या यशोमती ठाकूर?
2009 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तिवसा मतदारसंघात एकूण 2 लाख 43 हजार 802 मतदार होते. तर 2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत 2 लाख 70 हजार 408 मतदार होते. म्हणजेच 2009 ते 2014 या 5 वर्षाच्या कालावधीत 26 हजार 606 मते वाढली आहेत. याचा अर्थ एका वर्षात सरासरी 5 हजार 321 मतदार वाढले. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकूण 2 लाख 95 हजार 992 मतदार होते. म्हणजेच, 2014 ते 2019 या 5 वर्षाच्या काळात 25 हजार 584 मते वाढली. इथेही प्रतिवर्ष सरासरी 5 हजार 116 मतांमध्ये वाढ झाली.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत काय घडलं?
सरासरी प्रतिवर्ष 5 हजार मतदारांची नैसर्गिक वाढ लक्षात घेता 2024 मध्ये 3 लाख 20 हजार मतदारसंख्या होणे अपेक्षित होते. पण 2024 लोकसभा निवडणुकीत 2 लाख 84 हजार 243 एकूण मतदार होते. म्हणजे 2019 ते 2024 या 5 वर्षांत मतदारांमध्ये नैसर्गिक वाढ होण्याऐवजी आश्चर्यकारकरित्या 11 हजार 749 मतदार कमी झाले आहेत. या ठिकाणी नैसर्गिक वाढीचे 25 हजार आणि कमी झालेले 11 हजार 749 असे सुमारे 36 हजार मतदार कमी करण्यात आले आहेत.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत काय घडलं?
लोकसभा निवडणुकीनंतर 6 महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण मतदाराची संख्या 2 लाख 96 हजार 495 झाली. म्हणजे 6 महिन्यात 12 हजार 252 मते वाढली. त्यामुळे लोकसभा 2019 ते लोकसभा 2024 या कालावधीत मतदार वाढण्याऐवजी कमी का झाले? कमी झालेले मतदार कोणते? पुन्हा सहा महिन्यात वाढलेले 12 हजार 252 मतदार कोणते? या सर्व प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने दिल्यास 35 हजारापेक्षा जास्त मतांची चोरी उघड होईल, असा दावा यशोमती ठाकूर (Yashomati thakur) यांनी केला आहे.
अमरावतीत काँग्रेसचा उमेदवार 1 लाख मतांनी विजयी झाला असता ...
अमरावती लोकसभा मतदारसंघात 2009 साली एकूण 14 लाख 23 हजार 855 मतदार होते. 2014 मध्ये यात वाढ होऊन एकूण 16 लाख 12 हजार 739 मतदार झाले. म्हणजेच 5 वर्षात 1 लाख 88 हजार 884 मतदार वाढले. 2019 साली 18 लाख 33 हजार 91 मतदार झाले. म्हणजेच 5 वर्षात 2 लाख 20 हजार 352 मतदार वाढले. पण 2024 साली 18 लाख 38 हजार 768 म्हणजेच 5 वर्षात फक्त 5 हजार 677 मते वाढली आहेत. म्हणजेच अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या मतदार यादीतून जवळपास दीड ते दोन लाख मते वगळण्यात आली आहेत.
अशा परिस्थितीतही याठिकाणी काँग्रेसचे (Congress) उमेदवार बळवंत वानखडे 20 हजार मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. राज्यात विद्यमान राज्य आणि केंद्र सरकार विरोधात प्रचंड लाट होती. मतदार यादीतून एवढी मते वगळली नसती तर अमरावती लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार एक लाखापेक्षा जास्त मतांनी विजयी झाला असता, असा दावाही यावेळी यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
काँग्रेस विचारसरणीचे 25 हजार वगळली?
लोकसभा निवडणुकीत तिवसा मतदारसंघाच्या मतदार यादीतून काँग्रेस विचारसरणीचे 25 हजार मते कमी करून, तेवढीच किंवा त्यापेक्षा काही कमी मते भाजप विचारसरणीची समाविष्ट करण्यात आली असावी अशी शंका येते, असा दावा यशोमती ठाकूर यांनी केला. विधानसभा निवडणुकीवेळी तिवसा मतदारसंघात विरोधकांचा फारसा प्रभाव दिसून येत नव्हता. मात्र, ज्यावेळेस मी मतदार याद्या मागवल्या त्यावेळी चूक लक्षात आली. मतदार यादी एक्सेल फॉरमॅटमध्ये मागवल्या त्यानंतर नेमका प्रकार उघड झाला, असेही त्यांनी सांगितले.
मतचोरीचे संस्कार आमच्यावर नाहीत. त्यामुळे मतदारसंघात असे काही होणार नाही असे वाटले होते. मात्र, तिवसा मतदार संघातील मतदार यादीची एक्सल फाईल आल्यानंतर त्यामध्ये जवळपास 14 हजार मत बोगस दिसली. मतचोरीच्या विरोधात आक्रमकपणे काँग्रेसचे नेते राहुल गांधी मोहीम राबवत आहेत. त्यासाठी टीम काम करीत असून गडबड झालेल्या मतदारसंघातील आकडेवारीची खातरजमा स्वतंत्र यंत्रणेकडून केली जात आहे. मतचोरी काँग्रेसवाले हे होऊ देणार नाहीत. त्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी प्रसंगी कोर्टातही न्याय मागणार असल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.