

Mumbai, 04 May : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल आणि आसाम राज्यात निर्विवाद विजय मिळविला आहे. सार्वत्रिक निवडणुकीबरोबरच भाजपने पोटनिवडणुकीतही बाजी मारली आहे. सात जागांपैकी भाजपने चार, तर एक जागा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली आहे. कर्नाटकातील दोन जागा काँग्रेसने राखल्या आहेत, त्यामुळे एनडीएने पोटनिवडणुकीतही बाजी मारली आहे.
पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीबरोबरच गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, नागालॅंड आणि त्रिपुरा राज्यातील सात पोटनिवडणुकाही (BY Election) जाहीर करण्यात आल्या होत्या. यात महाराष्ट्रातील दोन, कर्नाटकातील दोन आणि गुजरात, नागालॅंड आणि त्रिपुरा या राज्यातील प्रत्येकी एका जागेचा समावेश होता.
सुनेत्रा पवारांचा मताधिक्क्याचा देशात विक्रम
महाराष्ट्रातील बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि राहुरीत भाजपने विजय मिळविला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे जाहीर झालेल्या बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी निवडणूक लढवली, त्यांना २ लाख १८ हजार ९६९ मते मिळाली आहेत, तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी आर. वाय. घुटुकडे यांना केवळ ९३५ मतं मिळाली आहेत.
सुनेत्रा पवार ह्या 2 लाख 18 हजार 034 मतांचे अधिक्क्य घेत निवडून आल्या आहेत. तो सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम झाला आहे. यापूर्वी २०२२ च्या निवडणुकीत उत्तरप्रदेशमधील सुनीलकुमार शर्मा हे २ लाख १४ हजार ८३५ मताधिक्याने विजयी झाले होते, तो विक्रम सुनेत्रा पवारांनी मोडला.
राहुरीत शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांनी 1लाख40 हजार 093 मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गोविंद मोकाटे यांना केवळ 27 हजार 506 मते मिळाली आहे, त्यामुळे अक्षय कर्डिले यांनी 1 लाख 12 हजार 587 मताधिक्क्याने विजय मिळविला.
कर्नाटकात काँग्रेसच
कर्नाटकमधील बागलकोटमधून काँग्रेसचे उमेश हुल्लप्पा मेती यांनी 22 हजार 332 मतांनी विजय मिळविला आहे. मेती यांना 98 हजार 919 मते मिळाली होती, तर भाजप उमेदवार चरणतिमठ वीरभद्रय्या (वीरण्णा) यांना 76 हजार 587 मते मिळाली आहेत.
दावणगेरेमध्येही काँग्रेसने बाजी मारली असून भाजपने या ठिकाणी जोरदार लढत दिली आहे. काँग्रेसचे समर्थ शमनूर मल्लिकार्जुन यांनी 5708 मतांनी विजय मिळविला आहे. त्यांना 69 हजार 578 मते मिळाली असून भाजपचे श्रीनिवास दासकरियप्पा यांनी 63 हजार 870 मते घेत जोरदार लढत दिली आहे.
नागालॅंडमधील कोरिडांग मतदारसंघातून भाजपचे दाओचियर इमचेन हे 3 हजार 123 मतांनी विजयी झाली आहेत. त्यांना 7 हजार 317 मते मिळाली असून विरोधातील अपक्ष उमेदवार तोशिकाबा यांना 4194 मते मिळाली आहेत.
त्रिपुरामधील धर्मनगरमध्ये भाजपचे जहर चक्रवर्ती हे 18 हजार 290 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना 24 हजार 291 मते मिळाली आहेत. विरोधातील कम्युनिस्ट पार्टीचे अमिताभ दत्ता यांना 6001 मते मिळाली आहेत.
गुजरातच्या उमरेठ मतदारसंघातून भाजपचे हर्षदभाई गोविंदभाई परमार हे 30 हजार 743 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना 85 हजार 500 मते मिळाली आहेत, तर विरोधातील काँग्रेसचे उमेदवार भृगुराजसिंह चौहान यांना 54 हजार 757 मते मिळाली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.