

Mumbai, 04 May : आसाम विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली विजयाची हॅटट्रीक केली आहे. तिसऱ्या वेळी सत्ता मिळविताना भाजप तब्बल ९८ जागांवर, तर काँग्रेस व मित्रपक्ष २४ जागी आघाडीवर आहे. भाजपच्या आसाममधील विजयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही खारीचा वाटा असून प्रचारसभा घेतलेल्या दोन्ही ठिकाणी भाजपने दणदणीत यश मिळविले आहे.
आसाम (Assam) विधानसभेची निवडणूक या वेळी हेमंत बिस्वा सरमा आणि काँग्रेस अशीच झाली. सरमा यांच्या विरोधात काँग्रेसची अख्खी टीम प्रचाराच्या मैदानात उतरली होती. सरमा यांच्या पत्नी रिनिकी भुईया सरमा यांकडे दुबईसह तीन देशांचे पासपोर्ट असल्याचा आरोप करण्यात आला होता, त्यावरून जोरदार राजकारण रंगले होते.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या टीममधील तरुण चेहरा आसामच्या निवडणुकीत उतरवला होता. मात्र, गौरव गोगाई यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. गौरव हे काँग्रेसचा आसाममधील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मानला जात होते. मात्र, त्यांना स्वतःची सीटही निवडून आणता आली नाही.
काँग्रेसप्रमाणेच भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून केंद्रीय मंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंंत्री यांनाही आसामच्या मैदानात प्रचारासाठी उतरविले होते. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचाही समावेश होता. त्यांच्या दोन सभा आसाममध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आसाममधील दिब्रूगड आणि जोरहाट या दोन मतदारसंघात प्रचारसभा घेतल्या होत्या. या दोन्ही मतदारसंघात भाजपने विजय मिळविला आहे. दिब्रूगडमध्ये भाजपचे प्रशांत फुकन हे तब्बल ७२ हजार ४३ मतांनी विजयी झाले आहेत, त्यांना १ लाख ६ हजार ८०३ मते मिळाली आहेत, त्यांचे प्रतिस्पर्धी आसाम राष्ट्रीय परिषदेचे माणिक पात्रा यांना 34 हजार 760 मते मिळाली आहेत. भाजपचे फुकन हे मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. या मतदारसंघात फडणवीसांनी सभा घेतली होती.
आसामच्या जोरहाट मतदारसंघातही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभा घेतली होती. या मतदासंघातून भाजपचे हितेंद्र नाथ गोस्वामी हे विजयी झाले आहेत. त्यांना 69 हजार 439 मतं मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार गौरव गोगई यांचा तब्बल २३ हजार १८२ मतांनी पराभव केला आहे. गोगई हे काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार मानले जात होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.