
Mumbai News : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे बहुमत मिळाले आहे. मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. येत्या काही दिवसांत नवीन सरकारचा शपथविधी होणार आहे. हे सर्व ठरलेले असताना खातेवाटपावरून महायुतीतील पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झालेली आहे. गृह, सार्वजनिक बांधकाम आधी महत्वाची, म्हणजेच मलाईदार खाती आपल्याला मिळावीत, असा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे. (Maharashtra Government Formation Updates)
महायुतीने विधानसभेची निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. त्यामुळे महायुतीची सत्ता आली तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रिपदी राहतील, असा विश्वास शिवसेनेच्या (Shivsena)नेत्यांना वाटत होता. महायुतीची सत्ता आली मात्र, बहुमत प्रचंड मोठे मिळाले. एकट्या भाजपला 132 जागा मिळाल्या. त्यामुळे शिंदेंची बार्गेनिंग पॉवर संपुष्टात आली. उद्धव ठाकरे यांना सोडून भाजपसोबत आलेल्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देण्यात आले होते. त्यावेळीही सर्वाधिक आमदार भाजपचेच होते. यावेळी मात्र भाजपने भूमिका बदलली. त्यातच अजितदादा पवार यांनीही मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीस यांना पाठिंबा दिला.
मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. आता रस्सीखेच सुरू झाली आहे महत्वाच्या खात्यांसाठी. शिवसेनेला गृह खाते हवे आहे. यावरूनच सध्या घोडे अडल्याचे सांगितले जात आहे. महायुतीच्या विजयात शिवसेनेचा मोठा वाटा आहे. त्यामुळे आपल्याला गृहमंत्रिपद हवे, असा शिवसेनेचा आग्रह आहे. यासह नगरविकास, उद्योग, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण आरोग्य, सांस्कृतिक, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क आदी खातीही शिवसेनेला हवी आहेत. शिवाय विधान परिषदेच्या सभापतिपदाची मागणीही शिवसेनेने केली आहे.
गृहखाते सक्षमपणे सांभाळणार, असा विश्वासही शिवसेनेचे नेते व्यक्त करत आहेत. महायुतीच्या सरकारमध्ये गृहखाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. गृह खाते हे मंत्रिमंडळातील सर्वात महत्वाचे खाते समजले जाते. राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी गृहमंत्र्यांवर असते. राज्याचा पोलिस विभाग या खात्याच्या अखत्यारित असतो. कार्यकर्त्यांचा पोलिस ठाण्यांशी दररोजचा संबंध असतो. गृहमंत्री आपल्या पक्षाचा असेल तर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची पोलिस खात्यातील कामे सहसा अडत नाहीत. त्याचा फायदा पक्षवाढीसाठी होतो आणि कार्यकर्तें, पदाधिकाऱ्यांचा समाजात मानही वाढतो.
गृहमंत्री हे सर्वात पॉवरफुल समजले जातात. मुख्यमंत्र्यांनंतर गृहमंत्र्यांचाच दबदबा असतो. त्यामुळे सरकार कोणत्याही आघाडी, युतीचे आले तरी गृहमंत्रालयासाठी रस्सीखेच होतेच. या खात्याच्या माध्यमातून मंत्री आणि त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते योग्य कामे करतात की अयोग्य कामे करतात, हा भाग आणखी वेगळा असतो. पक्षाचा विस्तार आणि कार्यकर्त्यांची कामे होणे, हेच डोळ्यांसमोर असते. राज्य पातळीवरही बऱ्याच महत्वाच्या बाबी गृहमंत्र्यांच्या अखत्यारित असतात. त्यामुळे पक्षाला फायदा होत असतो.
नगरविकास, महसूल, जलसंपदा, उद्योग, शिक्षण, राज्य उत्पादन शुल्क ही अशीच महत्वाची खाती आहे. मलाईदार खाती असा त्यांचा उल्लेख केला जातो. या खात्यांसाठीही सर्वच सरकारांमध्ये रस्सीखेच सुरू असते. गृहपाठोपाठ महसूल खात्यासाठी पक्ष आणि नेत्यांचा हट्ट असतो. महसूल विभागाशी सामान्य नागरिकांचाही दररोज संबंध येतो. तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयात नाकरिकांची अनेक कामे अडलेली असतात. राज्य उत्पादन शुल्कही राज्याला मोठे महसूल मिळवून देणारे खाते आहे.
नेहमीच बदनामीचे वार झेलणाऱ्या जलसंपदा खात्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. या खात्यामार्फत शेतीच्या सिंचनाशी संबंधित कामे प्रामुख्याने केली जातात. नगररचना खातेही खूप महत्वाचे मानले जाते. मुख्यमंत्री शक्यतो हे खाते स्वतःकडेच ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. उद्योग, शिक्षण ही खातीही महत्वाची आहेत. या खात्यांसाठी महायुतीतील पक्षांमध्ये आता रस्सीखेच सुरू झाली आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा जवळपास सोडला आहे, त्यामुळे ते आता गृहमंत्रिपदासाठी आग्रही झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.