Mumbai, 05 August : विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग येत असून महाविकास आघाडी आणि महायुतीकडून निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या नियोजन समितीची आज महत्वाची बैठक होत आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या शासकीय निवास स्थानी महायुतीच्या नेत्यांची चर्चा होणार आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या मुक्तागिरी या शासकीय निवासस्थानी मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही बैठक होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने बैठकीत महत्वाची चर्चा होणार आहे. यात जागा वाटप ते मतदारसंघ आणि प्रचाराचे नियोजन या संदर्भाने महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांची चर्चा होण्याची शक्यता आहे.
महायुतीची नियोजन समितीचे अध्यक्षपद भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्याकडे आहे. या समितीत भाजपकडून योगेश टिळेकर आणि अजित गोपछेडे, शिवसेना शिंदे गटाकडून मंत्री उदय सामंत आणि आशिष कुलकर्णी, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अनिकेत तटकरे आणि संजय खोडके हे समितीत असणार आहेत.
या नियोजन समितीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे. त्याचबरोबर जागा वाटप, मतदारसंघाची आदलाबदल, निवडणूक येण्याचा निकष, प्रचार आणि इतर बाबींवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. या समितीच्या अहवालानंतर वरिष्ठ नेते जागा वाटपावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून स्वतंत्ररित्या निवडणुकीच्या तयारी सुरू आहे. अजित पवार गटाकडून येत्या आठ तारखेपासून जनसन्मान यात्रा काढण्यात येणार आहे. त्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून सुरू आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजप आमदारांच्या बैठका घेत आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातील आमदारांच्या बैठकीनंतर आज मुंबई आणि परिसरातील आमदारांच्या बैठका देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी होणार आहेत. या बैठकीत मतदारसंघातील सद्यस्थितीचा आढावा फडणवीस घेणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.